Bcci : चाहत्यांनी सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाची लाज काढली, रोहित-विराटच्या शतकानंतर काय झालं?

Vijay Hazare Trophy: बीसीसीआयच्या एका निर्णयामुळे चाहत्यांमध्ये संतप्त पाहायला मिळाले. बीसीसीआयने असा निर्णय घेण्याआधी एकदा विचार करायला हवा होता, असं संतप्त चाहत्यांचं म्हणणं आहे.

Bcci : चाहत्यांनी सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाची लाज काढली, रोहित-विराटच्या शतकानंतर काय झालं?
Rohit Sharma and Virat Kohli
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 24, 2025 | 8:19 PM

विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेच्या थराराला बुधवार 24 डिसेंबरपासून सुरुवात झाली. टीम इंडियाची अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी या स्पर्धेत अनेक वर्षांनी कमबॅक केलं. विराट आणि रोहितने या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात धमाका केला. रोहित आणि विराट या दोघांनी खणखणीत शतकं झळकावत आपल्या संघाला जिंकवलं. रोहितने मुंबईसाठी सर्वाधिक 155 धावा केल्या. तर विराटनेही शतक ठोकलं. त्याव्यरिक्त 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि इशान किशन या दोघांनीही आपल्या संघासाठी शतक ठोकलं. मात्र चाहत्यांचं लक्ष रोहित आणि विराट या दोघांकडेच होतं.

रोहितने विजयी धावांचा पाठलाग करताना सिक्कीम विरुद्ध दीडशतकी खेळी केली. तर विराटने आंध्रप्रदेश विरुद्ध शततक झळकावलं. या दोघांनी या शतकी खेळीसह संघाला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली. क्रिकेट चाहत्यांनी रोहितची बॅटिंग पाहण्यासाठी स्टेडियममध्ये एकच गर्दी केली होती. रोहित आणि विराटने मोठी खेळी करुन चाहत्यांची मनं जिंकली. मात्र या चाहत्यांनी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणाऱ्या बीसीसीआवर संताप व्यक्त केला आहे.

चाहत्यांचा संताप, पण का?

मुंबई विरुद्ध सिक्कीम आणि दिल्ली विरुद्ध आंध्रप्रदेश या सामन्यांचं प्रक्षेपण करण्यात आलं नाही. ज्यांना शक्य होतं ते रोहितचा खेळ पाहण्यासाठी जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पोहचले. रोहितचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडयिममध्ये एकच गर्दी केली. रोहितने सिक्कीम विरुद्ध दीडशतकी खेळी साकारली.

बीसीसीआय विरुद्ध चाहते संतप्त

दुसर्‍या बाजूला दिल्ली विरुद्ध आंध्रप्रदेश हा सामना बंद दाराआड खेळवण्यात आला. त्यामुळे चाहत्यांना इच्छा असूनही हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाता आलं नाही. तसेच सामन्याचं प्रक्षेपणही करण्यात आलं नाही. त्यामुळे चाहत्यांची चांगलीच गैरसोय झाली. या रागातून क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयला सोशल मीडियावर फैलावर घेतलं आहे.

नेटकऱ्यांचं बीसीसीआयबाबत असं ट्विट

रोहित-विराटचा चाहता वर्ग किती मोठा आहे? हे क्रिकेट रसिकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. या दोघांचा फॅनबेस पाहता बीसीसीआयने सामन्याचं प्रक्षेपण करायलं हवं होतं. ती जबाबदारी बीसीसीआयची होती. मात्र ठराविक आणि मोजक्याच सामन्यांचं प्रक्षेपण करण्यात आलं. त्यामुळे चांहत्यांना राग अनावर झाला. त्यामुळे नेटकऱ्यांनी बीसीसीआयची सोशल मीडियावरुन लाज काढली आहे.