VHT : रोहितची 155 धावांची वादळी खेळी, सिक्कीमचा 8 विकेट्सने धुव्वा, 30 ओव्हरमध्येच काम तमाम
VHT Mumbai vs Sikkim Match Result : मुंबई क्रिकेट टीमने विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 या मोहिमेतील आपल्या पहिल्याच सामन्यात एकतर्फी आणि धमाकेदार विजय मिळवलाय. मुंबईने सिक्कीमव 8 विकेट्सने विजय मिळवला.

शार्दुल ठाकुर याच्या नेतृत्वात आणि हिटमॅन रोहित शर्मा याने केलेल्या तडाखेदार खेळीच्या जोरावर मुंबई टीमने विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली आहे. मुंबईने जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये सिक्कीमचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. सिक्कीमने मुंबईसमोर 237 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान रोहितच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं आणि एकतर्फी विजय साकारला. मुंबईने 30.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. रोहित मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला.
मुंबईच्या सलामी जोडीची शतकी भागीदारी
मुंबईच्या विजयात रोहितने प्रमुख भूमिका बजावली. तर अंगकृष रघुवंशी, मुशीर खान आणि सर्फराज खान या फलंदाजांनीही बॅटिंगने विजयात योगदान दिलं. रोहित आणि अंगकृष या जोडीने मुंबईसाठी भक्कम सुरुवात करुन विजयाचा पाया रचला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 141 रन्सची पार्टनरशीप केली. मुंबईने अंगकृषच्या रुपात पहिली विकेट गमावली. अंगकृषने 58 बॉलमध्ये 4 फोरसह 38 रन्स केल्या.
अंगकृषनंतर रोहितने युवा मुशीर खान याच्यासह किल्ला लढवला. रोहितने मुशीरसह निर्णायक भागीदारी करत मुंबईचा विजय निश्चित केला. रोहितने मुशीरसह भागीदारी करत शतक आणि दीडशतक झळकावलं. रोहितने अवघ्या 62 बॉलमध्ये शतक झळकावलं. रोहित ज्या अंदाजात खेळत होता त्यानुसार तो मुंबईला जिंकूनच मैदानाबाहेर जाणार असं चित्र होतं. मात्र मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर असताना रोहित आऊट झाला.
रोहित आणि मुशीरने दुसऱ्या विकेटसाठी 58 बॉलमध्ये 85 रन्सची पार्टनरशीप केली. तर रोहितने 94 बॉलमध्ये 18 फोर आणि 9 सिक्सच्या मदतीने एकूण 155 धावा केल्या. रोहितने 164 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. त्यानंतर सर्फराज आणि मुशीर या खान बंधूंनी उर्वरित 11 धावा करुन मुंबईला जिंकवलं. सर्फराजने नाबाद 8 तर मुशीरने नॉट आऊट 27 रन्स केल्या.
सिक्कीमची बॅटिंग
त्याआधी सिक्कीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. सिक्कीमने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 236 धावा केल्या. सिक्कीमसाठी आशिष थापा याने सर्वाधिक 79 धावा केल्या. तर त्याव्यतिरिक्त एकालाही 34 पार पोहचता आलं नाही. मुंबईसाठी शार्दुल ठाकुर याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मुशीर खान, शम्स मुलानी, तुषार देशपांडे आणि तुनष कोटीयन या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
