Irfan Pathan : एक तर.., इरफान पठाणने बुमराहला सुनावलं, काय म्हणाला?
Irfan Pathan On Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह याने इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत वर्कलोड मॅनेजमेंटमुळे 5 पैकी 3 सामने खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार बुमराहने 2 सामने खेळले. आता चौथ्या सामन्यात बुमराह त्याचा तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. त्याआधी भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने बुमराहबाबत काय म्हटलं? जाणून घ्या.

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडून इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहेत. भारताला मालिकेत कायम राहण्यासाठी मँचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. या सामन्याला 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे. जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार असल्याचं वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने 21 जुलैला पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं. या चौथ्या सामन्याआधी भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने थेट स्पष्ट शब्दात बुमराहला सुनावलं आहे.
इरफान पठाणने काय म्हटंल?
“मी जसप्रीत बुमराहचं फार कौतुक करतो. मला त्याच्या कलेवर प्रेम आहे. तो खरंच अप्रतिम गोलंदाज आहे. मात्र जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा पूर्ण समर्पणाने खेळायला हवं. तुम्ही जर 5 ओव्हर टाकल्या आणि जो रुट बॅटिंगसाठी आल्यावर सहावी ओव्हर टाकणार नसाल तर ते योग्य नाही.एक तर तुम्ही स्वत:ला झोकून द्या किंवा आराम करा”, असं इरफानने त्याच्या यूट्युब चॅनेलवरील एका व्हीडिओत म्हटलं.
“देश आणि संघापैकी संघ सर्वात प्रथम असायला हवा. बुमराहने प्रयत्नच केले नाहीत अशातला भाग नाही. त्याने बॉलिंग केली. मात्र तुम्हाला संघासाठी जास्त मेहनत करायला हवी. जर त्याने भारताला सातत्याने सामने जिंकवले तर तो टॉपवर राहिल. जेव्हा संघाला तुमची गरज असते तेव्हा तुम्हाला आणखी मेहनत करायला हवी. बेन स्टोक्स यानेही तसंच केलं आणि 4 वर्षांनंतर कमबॅक करणाऱ्या जोफ्रा आर्चरकडूनही तसंच पाहायला मिळालं”, असंही इरफानने नमूद केलं.
चौथ्या सामन्यात ‘करो या मरो’
बुमराहने लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहला त्यानंतर वर्कलोड मॅनेजमेंटनुसार दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली. बुमराहने तिसऱ्या सामन्यातून कमबॅक केलं आणि पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 असे एकूण 7 विकेट्स मिळवल्या. बुमराहकडून मँचेस्टमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी अपेक्षित असणार आहे.
भारतीय संघ या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे.त्यामुळे भारताला मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी चौथा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. भारताने हा सामना गमावल्यास मालिका पराभव निश्चित होईल. त्यामुळे या अटीतटीच्या सामन्यात शुबमनसेना कशी कामगिरी करते? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.
