त्याच्या मृत्यूची अफवा जगभर पसरली, सहकाऱ्यांनीही श्रद्धांजली वाहिली, शेवटी तो महान क्रिकेटपटूच म्हणाला, मै जिंदा हूँ !; काय घडलं?
झिम्बॉब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीक याचं निधन झाल्याचं वृत्त अफवा निघालं आहे. स्वत: स्ट्रीकने आपण जिवंत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या अफवांवर दु:खही व्यक्त केलं आहे.

हरारे ! 23 ऑगस्ट 2023 : झिम्बॉबवेचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक याचं काल वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाल्याची बातमी भल्या सकाळीच येऊन धडकली. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली. स्ट्रीकचा सहकारी हेनरी ओलंगा यानेही ट्विट करून आपल्या परम मित्राला श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे स्ट्रीक गेल्याची सर्वांनाच खात्री पटली आणि जगभरातील त्याच्या चाहत्याने त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला. संपूर्ण क्रिकेट जगत शोकसागरात बुडालेलं असतानाच आपल्या मृत्यूची बातमी ऐकून स्वत: स्ट्रीकलाही धक्का बसला. त्याने लगोलग मी जिवंत आहे. मेलेलो नाही, असं म्हणत आपल्या मृत्यूची बातमी ही निव्वळ आफवा असल्याचं म्हटलं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
मी जिवंत आहे. मेलेलो नाही. माझ्या निधनाची बातमी वाचून मला प्रचंड दु:ख झालं, असं हीथ स्ट्रीकने म्हटलं आहे. त्याला लिव्हर कॅन्सर झाला आहे आणि दक्षिण आफ्रिकेत तो उपचार घेत आहे. स्ट्रीकचा सहकारी हेनरी ओलंगा यानेही त्याच्या निधनावर शोक व्यक्त करणारं ट्विट केलं होतं. पण स्ट्रीकचं निधन ही केवळ अफवा असल्याचं दिसून आलं तेव्हा ओलंगाने ट्विट बदलत दिलगिरीही व्यक्त केली आहे. तसेच आपल्या मित्राला दीर्घायुष्य लाभण्याची कामनाही केली आहे.
12 वर्षाचं आंतरराष्ट्रीय करिअर
हीथ स्ट्रीक हा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीच्या स्किलमुळे तो ओळखला जातो. एक यशस्वी कर्णधार म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरला 12 वर्ष दिली आहेत. त्याच्या काळात तो जगभरातील अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. मात्र, सध्या तो कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. या आजारावर त्याचे उपचार सुरू आहेत. उपचारासाठी तो दक्षिण आफ्रिकेत असल्याने अनेकांशी त्याचा संपर्क तुटला होता. त्यातूनच आज त्याच्या निधनाची अफवा पसरली. या बातम्यांवर त्याने दु:ख व्यक्त केलं आहे.
एकमेव शतकाचा धनी
गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही त्याने कौशल्य दाखवलं आहे. त्याने मिडल ऑर्डरमध्ये येऊन धावांचा पाऊस पाडला आहे. कसोटी सामन्यात त्याने 1990 तर एकदिवसीय सामन्यात 2943 धावा केल्या आहेत. त्याने हरारेमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना शतकही ठोकलं आहे. त्याच्या आयुष्यातील कसोटीतील हे एकमेव शतक आहे.
त्याने 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. त्याचा पहिला कसोटी सामना पाकिस्तान विरुद्ध होता. कराचीत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला एकही बळी मिळाला नाही. त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र, करिअरच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने 8 विकेट घेतले होते. रावळपिंडीत हा दुसरा कसोटी सामना पार पडला होता.
