फक्त…, हार्दिक-शुबमन यांच्यात 36 चा आकडा? गिलने इंस्टा स्टोरीतून सर्वच सांगितलं
Shubman Gill Insta Story On Hardik Pandya : शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या या दोघांमध्ये आयपीएल 2025 एलिमिनेटर सामन्यात चढाओढ पाहायला मिळाली. हार्दिकने शुबमनला डिवचण्याचा प्रयत्न केला. यावरुन आता शुबमनने इंस्टा स्टोरीतून खरं काय ते सांगितलं आहे.

मुंबई इंडियन्सने शुक्रवारी 30 मे रोजी आयपीएल 2025 एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सवर 20 धावांनी मात करत क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली. मुंबईने गुजरातसमोर 229 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र गुजरातला 208 रन्सच करता आल्या. त्यामुळे शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स क्वालिफायर 2 मध्ये पोहचण्यात अपयशी ठरली. गुजरातचं या पराभवासह आव्हान संपुष्ठात आलं. तर मुंबई आता हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात 1 जून रोजी क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध भिडणार आहे. मुंबई-गुजरात सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसलं नाही. दोघांनीही टॉस दरम्यान हस्तांदोलन केलं नाही. तसेच हार्दिकने संधी मिळेल तेव्हा शुबमनला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी झालंय, अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली. त्यानंतर अखेर या प्रकरणावरुन शुबमन गिल याने मौन सोडलं आहे. शुबमनने इंस्टा स्टोरीद्वारे या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शुबमनच्या इंस्टा स्टोरीत काय?
शुबमनने इंस्टा स्टोरीत हार्दिक सोबतचा जीटी विरुद्ध मुंबई सामन्यातील फोटो आणि टीम इंडियातील फोटो पोस्ट केला आहे. तसेच शुबमनने या कथित वादावरुन प्रतिक्रिया दिली आहे. काही नाही फक्त प्रेम आहे, असं शुबमनने म्हटलंय. तसेच शुबमनने या स्टोरीद्वारे चाहत्यांना आवाहनही केलंय. “इंटरनेटवर तुम्ही जे काही पाहता त्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेऊ नका”, असंही शुबमनने चाहत्यांना म्हटलं आहे. तसेच शुबमनने या स्टोरीत हार्दिकला टॅग केलंय.
दोघेही एकाच संघाचा भाग
हार्दिक आणि शुबमन गिल हे दोघेही आयपीएल स्पर्धेतील 2 हंगामात एकत्र खेळले आहेत. दोघेही 2022 आणि 2023 साली गुजरातकडून एकत्र खेळले. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने या दोन्ही हंगामात अंतिम फेरीत धडक दिली. मात्र त्यानंतर हार्दिकला 17 व्या मोसमाआधी मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या गोटात घेतलं. त्यामुळे शुबमनला गुजरातच्या नेतृत्वाची संधी मिळाली.
शुबमन गिल याची इंस्टा स्टोरी
🚨 INSTAGRAM STORY OF CAPTAIN GILL 🚨 pic.twitter.com/YtuXs2eUBG
— Johns. (@CricCrazyJohns) May 31, 2025
मुंबईकडून परतफेड
दरम्यान मुंबई आणि गुजरातची एलिमिनेटरनिमित्ताने 18 व्या मोसमात आमनेसामने येण्याची तिसरी वेळ होती. गुजरातने साखळी फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईवर मात केली होती. त्यामुळे गुजरातकडे विजयी हॅटट्रिकची संधी होती. मात्र मुंबईने निर्णायक सामन्यात गुजरातचा धुव्वा उडवत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आणि गेल्या 2 पराभवांची अचूक परतफेड केली.
