Team India : विजयी सुरुवातीनंतर पराभवाचा चौकार, टीम इंडियाची फ्लॉप कामगिरी
Hong Kong Sixes 2025 : टीम इंडियाची हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत निराशाजनक कामगिरी राहिली. भारताला 5 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला. तर 4 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. भारताला कुवेत, यूएई आणि नेपाळसारख्या लिंबुटिंबु संघांकडून पराभूत व्हावं लागलं.भारताला या स्पर्धेत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत टीम इंडियाने दिनेश कार्तिक याच्या नेतृत्वात 6 षटकांच्या सामन्यात कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करत विजयी सलामी दिली. त्याच पाकिस्तानने अंतिम सामन्यात यजमान कुवेतला पराभूत करत ट्रॉफीवर नाव कोरलं. पाकिस्तानने कुवेतवर 43 धावांनी विजय साकारला. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने दणकेदार सुरुवातीनंतर घोर निराशा केली. भारताला पहिल्या विजयानंतर सलग 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. दुर्देवी म्हणजे भारताला अपवाद वगळता तुलनेत नवख्या संघांकडून पराभव स्वीकारावा लागला. भारताला 24 तासांमध्ये सलग 4 वेळा पराभव स्वीकारावा लागला.
हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेत 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान 12 संघांमध्ये एकूण 29 सामने खेळवण्यात आले. त्यानंतर विजेता संघ निश्चित झाला. भारताने विजयी सुरुवात केल्यानंतर चाहत्यांना अनेक आशा होत्या. मात्र भारताचे माजी खेळाडू चाहत्यांच्या विश्वासावर खरे उतरले नाहीत. भारताचा 8 नोव्हेंबरला 3 सामन्यांमध्ये पराभव झाला. त्यामुळे भारताकडे या मोहिमेतील आपल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याची संधी होती. मात्र भारताने या सामन्यातही प्रतिस्पर्धी संघासमोर गुडघे टेकले.
भारताच्या पराभवाचा चौकार
भारताला आपल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेने आधी 6 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 138 धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात भारताला 139 धावांचा पाठलाग करताना 3 विकेट्स गमावून 90 रन्सच करता आल्या.
कुवेत विरुद्ध 27 धावांनी पराभव
त्याआधी टीम इंडियाला 8 नोव्हेंबरला कुवेत, यूएई आणि नेपाळने लोळवलं. कुवेतने सर्वातआधी भारतावर 27 धावांनी विजय मिळवला. कुवेतच्या 107 धावांचा पाठलाग करताना भारताला पूर्ण 6 ओव्हरही खेळता आलं नाही. कुवेतने भारताला 5.4 ओव्हरमध्ये 79 रन्सवर ऑलआऊट केलं.
यूएईला रोखण्यात गोलंदाज अपयशी
भारतान यूएईसमोर 108 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाज यूएईला रोखू शकले नाहीत. यूएईने 1 बॉल ठेवून 4 विकेट्सने हा सामना जिंकला.
नेपाळ विरुद्ध फलंदाज ढेर
नेपाळच्या सलामी जोडीने भारतासमोर नॉट आऊट 137 रन्सची पार्टनरशीप केली. तर टीम इंडियाचं 3 ओव्हरमध्येच 45 रन्सवर पॅकअप झालं. नेपाळने अशाप्रकारे हा सामना 92 धावांनी जिंकला.
पाकिस्तान फायनलमध्ये 43 धावांनी विजयी
पाकिस्तान टीमने कुवेत विरुद्ध 3 विकेट्स गमावून 135 रन्स केल्या. त्यानंतर पाकिस्तानने 136 रन्सचा पाठलाग करणाऱ्या कुवेतला 5.1 ओव्हरमध्ये 92 रन्सवर ऑलआऊट केलं. पाकिस्तानने यासह ट्रॉफी मिळवली.
