IND vs NZ : वरुण चक्रवर्तीचा किवींना ‘पंच’, टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक, न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा
India vs New Zealand CT 2025 : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. वरुण चक्रवर्ती याने टीम इंडियासाठी या सामन्यात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेमधील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत न्यूझीलंडला 45.3 ओव्हरमध्ये 205 धावांवर गुंडाळलं आणि विजय मिळवला. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती हा टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफी पदार्पणात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडला 5 झटके दिले.
वरुणचा पंजा आणि किवी ढेर
न्यूझीलंडकडून केन विलियमसन याने सर्वाधिक 81 धावा केल्या. केनच्या 120 बॉलमध्ये 7 फोर लगावले. मात्र केन व्यतिरिक्त एकालाही टीम इंडियाच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. केनचा अपवाद वगळता इतर कुणालाही 30 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. कॅप्टन मिचेल सँटनर याने 28 तर विल यंग याने 22 धावा केल्या. तर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना 20 धावांच्या आत रोखत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
वरुणने 10 ओव्हरमध्ये 42 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. वरुणच्या एकदिवसीय कारकीर्दीतील चॅम्पियन्स ट्रॉफीतील हा पहिलाच सामना होता. वरुणने पहिल्याच सामन्यात 5 विकेट्स घेत आपली छाप सोडली. तसेच कुलदीप यादव याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेत चांगली साथ दिली.
पहिल्या डावात काय झालं?
त्याआधी टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 249 धावा केल्या. टीम इंडियासाठी श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 79 धावा केल्या. अक्षर पटेल याने 42 धावांचं योगदान दिलं. तर हार्दिक पंड्याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत 45 धावांची निर्णायक खेळी केली. तर इतरांनीही योगदान दिलं. तर न्यूझीलंडसाठी मॅट हेन्री याने 5 विकेट्स मिळवल्या. तर न्यूझीलंडच्या इतर 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
टीम इंडियाचा दुबईत 44 धावांनी विजय
Varun Chakravarthy leads the charge with the ball as India register a dominant win to remain unbeaten at the #ChampionsTrophy 🔥#NZvIND ✍️: https://t.co/F2UBD2cv49 pic.twitter.com/dimjQeDAUz
— ICC (@ICC) March 2, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओरुर्के.
