IND vs NZ : चिवट बॉलिंग आणि कडक फिल्डिंग, टीम इंडियाला 249 धावांवर रोखलं, किवींसमोर 250 रन्सचं टार्गेट
New Zealand vs India 1st Innings Highlights : न्यूझीलंडने टीम इंडियाला 250 धावांच्या आत रोखण्यात यश मिळवलंय. न्यूझीलंडसाठी मॅट हेन्री याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने चिवट बॉलिंग आणि कडक फिल्डिंग करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला 250 पार मजल मारण्यापासून रोखलं. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 250 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 249 धावा केल्या. टीम इंडियासाठी श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर हार्दिक पंड्या याने अखेरच्या क्षणी स्फोटक खेळी केली.त्यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडला सन्मानजनक आव्हान देता आलं.
टीम इंडियाची बॅटिंग
न्यूझीलंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने टीम इंडियाला झटपट 3 झटके दिले त्यामुळे 3 बाद 30 अशी स्थिती झाली. शुबमन 2, रोहित 15 आणि विराट 11 धावांवर बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. मात्र त्यानंतर अक्षर 61 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्ससह 42 रन्स केल्या.
अक्षरनंतर श्रेयस आणि केएल राहुल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर 98 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 79 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर न्यूझीलंडने टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके दिले. श्रेयसनंतर केएल राहुल 23 आणि रवींद्र जडेजा 16 धावांवर बाद झाला. अखेरच्या क्षणी हार्दिक पंड्याने काही मोठे फटके मारले. त्यामुळे टीम इंडियाला 240 पार पोहचता आलं. हार्दिकने 45 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 45 रन्स केल्या. मोहम्मद शमी 5 धावांवर माघारी परतला. तर कुलदीप यादव 1 रनवर नॉट आऊट परतला.
न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. कायले जेमीन्सन, विलियम ओरुर्के, कॅप्टन मिचेल सँटनर आणि रचीन रवींद्र या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. आता टीम इंडियाचे गोलंदाज या 249 धावांचा यशस्वी बचाव करतात का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओरुर्के.
