IND vs AUS 2nd Odi | ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ तर टीम इंडियाला मालिका विजयाची संधी, कोण जिंकणार?
India vs Australia 2nd Odi Match | केएल राहुल याला कॅप्टन म्हणून कांगारुंची शिकार करण्याची सुवर्णसंधी आहे. टीम इंडिया इंदूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जिंकणार का?

इंदूर | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका होत आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना हा 22 सप्टेंबर रोजी मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये पार पडला. टीम इंडियाने हा सामना 5 विकेट्च्या फरकाने जिंकला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. तर टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे.
दुसरा एकदिवसीय सामना हा 24 सप्टेंबर रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. केएल राहुल टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाची सूत्रं आहेत. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला याच वर्षी मार्च महिन्यात 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला आता दुसरा सामना जिंकून या मालिका पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी आहे.
पहिल्या सामन्याचा धावता आढावा
दरम्यान टीम इंडियाने पहिला सामन्यात मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 276 धावांवर गुंडाळलं. शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. त्यानंतर शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव आणि कॅप्टन केएल राहुल या चौघांच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 277 धावांचं आव्हान हे 48.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.
पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया
केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
