IND vs ENG : यशस्वीला पहिल्या सामन्यात केलेल्या चुकांचा बसणार फटका, सरावादरम्यान झालं असं की…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील भारताची सुरुवात पराभवाने झाली. खरं तर पहिला सामना भारताच्या पारड्यात होता. मात्र निराशाजनक कामगिरीमुळे भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवाला यशस्वी जयस्वाल हा देखील कारणीभूत ठरला. आता त्याला त्याचा फटका बसू शकतो.

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका जिंकणं येथे खूपच कठीण आहे. 2007 नंतर भारताने येथे एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यात शुबमन गिलच्या नेतृत्वात नवखा संघ मैदानात उतरला आहे. त्यामुळे अनुभवाची उणीव स्पष्ट दिसत आहे. पहिल्या कसोटीत खोऱ्याने धावा करूनही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे या मालिकेत भारताचं काही खरं नाही हे पहिल्याच सामन्यात स्पष्ट झालं आहे. पहिला सामना भारताने सुमार गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे गमावला. यात भारताने 8 झेल सोडले आणि त्याचा फटका भारताला पराभवाच्या रुपाने मिळाला. यात यशस्वी जयस्वालने 4 झेल सोडले. या नंतर त्याला त्याचा फटका बसणार हे स्पष्ट होतं. आता भारताच्या सराव शिबिरातील काही फोटो समोर आले आहेत. यात स्लिप कॉर्डनमध्ये यशस्वी जयस्वालला स्थान मिळालेलं नाही. त्याच्या जागी साई सुदर्शन फिल्डिंग करताना दिसला.
लीड्स कसोटीत यशस्वी जयस्वाल स्लिप कॉर्डनचा भाग होता. पण येथे क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हातून झेल सुटले होते. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेटने पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘आम्हाला काय कॅचिंग विभागात चांगली कामगिरी हवी असते. यशस्वी नेहमीच एक चांगला कॅचर राहिला आहे. पहिल्या कसोटीनंतर आम्हाला त्याचा आत्मविश्वास कायम ठेवायचा आहे. शॉर्ट लेग फिल्डिंग ही चांगली पोझिशन आहे. आम्हाला येथे जास्तीत जास्त लोक हवे आहेत. यशस्वीला स्लिपमधून बाहेर ठेवण्याचा उद्देश त्याला विश्रांती देणे आहे. कारण त्याचे हात खूप दुखत आहेत.’
Looks like Sai Sudharsan will replace Yashasvi Jaiswal in the slips. YBJ doing silly point/short leg drills while Sai trains with rest of the slip fielders. pic.twitter.com/kYfvDMDYX7
— Sahil Malhotra (@Sahil_Malhotra1) June 30, 2025
पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्याच डावात त्याने शतक ठोकलं होतं. त्याच्या 101 धावांमुळे भारताला चांगली सुरुवात मिळाली होती. पण दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीत सूर गवसला नाही. फक्त 4 धावा करून तंबूत परतला. आता दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. धावांसह क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी करेल असं आशा क्रीडाप्रेमी बाळगत आहेत. दरम्यान, बर्मिंगहॅममध्ये भारताची कामगिरी हवी तशी नाही. आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे.
