
भारत इंग्लंड चौथ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. अपेक्षेप्रमाणे केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगली सुरुवात करून दिली. तर शुबमन गिल या डावात काही खास करू शकला नाही. त्यामुळे आता मधल्या फळीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पण या सामन्यातील प्लेइंग इलेव्हन पाहून कैफच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. त्याने कर्णधार शुबमन गिलवर टीकास्त्र सोडलं आहे. करुण नायरच्या जागी साई सुदर्शनला संधी दिल्याने संताप व्यक्त केला आहे. मोहम्मद कैफने चौथ्या कसोटीतून करुण नायरला वगळल्याने राग व्यक्त केला आहे. मोहम्मद कैफने लिहिलं की, ‘आज शुबमन गिलला करुण नायरच्या बाजूने उभं राहण्याची संधी मिळाली होती. त्याने त्याला एक संधी द्यायला हवी होती. पण त्याने सन्मान मिळवण्याची संधी गमावली आहे. कठीण काळात कणखर निर्णय घेतल्यानेच कर्णधार म्हणून ओळख निर्माण होते.’
मोहम्मद कैफच्या या विधानानंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजू प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. काही जण कैफच्या विधानाशी सहमत नाहीत. कारण करुण नायरने तीन कसोटी सामन्यातील सहा डावात काही खास कामगिरी केली नाही. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. तसेच इतर सामन्यातही संधी मिळाली पण अर्धशतकी खेळी करू शकला नाही. करुण नायरने सहा डावात फक्त 131 धावा केल्या आहेत. टॉप 6 मधील अर्धशतकी खेळी न करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे.
Today was Shubman Gill’s chance to back karun who was down but deserved one more chance. He should have picked Karun Nair. Chance missed to earn the respect when it comes to making tough decisions as a leader.
— Mohammad Kaif (@MohammadKaif) July 23, 2025
दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी शुबमन गिलने त्याची पाठराखण केली होती. तो एक चांगला फलंदाज आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे त्याला चौथ्या कसोटीत आणखी एक संधी मिळेल असं वाटत होतं. पण नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर त्याच्या ऐवजी साई सुदर्शनला संधी मिळाली. त्यामुळे मोहम्मद कैफ नाराज असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी करुण नायरच्या तंत्रात काही समस्या असल्याने त्याला वगळण्यात आल्याचं मत व्यक्त केलं आहे. आता साई सुदर्शन या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.