IND vs ENG : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बीसीसीआयला शहाणपण सुचलं, खडे बोल सुनावल्यानंतर चूक सुधारली

भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये सुरु आहे. सामन्याचा तिसरा दिवस असून इंग्लंडने बेझबॉल रणनितीने चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यात आर अश्विनला कौटुंबिक कारणामुळे सामना मध्यातच सोडावा लागला. अशा सर्व घडामोडी घडत असताना बीसीसीआयला एका गोष्टीचा विसर पडला होता. अखेर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बीसीसीआने चूक सुधारली.

IND vs ENG : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बीसीसीआयला शहाणपण सुचलं, खडे बोल सुनावल्यानंतर चूक सुधारली
IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात बीसीसीआयला पडला होता विसर, अर्धा सामना संपल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ
| Updated on: Feb 17, 2024 | 12:39 PM

मुंबई : भारत इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीला 15 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. आता कसोटीचा तिसरा दिवस सुरु असून इंग्लंडने भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर रचला होता. त्याला इंग्लंडच्या बेझबॉलने अपेक्षित उत्तर देत 300 पार धावा केल्या आहेत. असं असताना कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बीसीसीआयला उपरती झाली आहे. भारतीय खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहे. त्यामुळे नेमकं काय झालं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण हे काही अचानक झालं नाही तर बीसीसीआयने आपली चूक तिसऱ्या दिवशी दुरुस्त केली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं. 13 फेब्रुवारीला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वातून श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र त्यांचा सन्मान करण्याचा बीसीसीआयला विसर पडला. त्यानंतर बीसीसीआय आणि टीम व्यवस्थापनाला खडे बोल सुनावण्यात आले. त्यानंतर बीसीसीआयने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चूक दुरुस्त करत खेळाडूंना हातावर काळी पट्टी बांधण्यास सांगितलं.

दत्ताजीराव गायकवाड गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. 13 फेब्रुवारीला त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या 95 वर्षी अखेरचा श्वास घेतला. गायकवाड यांनी 1952 ते 1961 या कालावधीत 11 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 350 धावा केल्या. तर 1959 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवलं होतं. इतकंच नाही तर त्यांचे पूत्र अंशुमान गायकवाड यांनी टीम इंडियाचं नेतृत्व केलं आणि 40 कसोटी सामने खेळले.

माजी क्रिकेटपटूचं निधन होतं तेव्हा खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरतात. पण यावेळी खेळाडूंच्या हातावर काळी पट्टी दिसली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. अखेर तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचे खेळाडू फिल्डिंगसाठी उतरले तेव्हा त्यांच्या हातावर काळी पट्टी बांधलेली होती.

दरम्यान कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने कमबॅक केलं आहे. आर अश्विनची उणीव कुलदीप यादवने भरून काढली. डकेटला बाद करत टीम इंडिया चांगल्या स्थितीत आहे. दुसऱ्या दिवशीची बेझबॉल रणनिती तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात नरम पडल्याची दिसली.