IND vs NZ : भारताची विजयी सलामी, नागपूरमध्ये 10 वर्षांआधीच्या पराभवाची वसुली, किवींचा अचूक हिशोब

India vs New Zealand 1st T20I Match Result : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पहिल्या टी 20i सामन्यात धुव्वा उडवून 2016 मधील पराभवाची अचूक परतफेड केली आहे.

IND vs NZ : भारताची विजयी सलामी, नागपूरमध्ये 10 वर्षांआधीच्या पराभवाची वसुली, किवींचा अचूक हिशोब
Team India Won By 48 Runs Against New Zealand
Image Credit source: Bcci
| Updated on: Jan 21, 2026 | 11:21 PM

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 21 जानेवारीला विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा अचूक हिशोब करत विजयी सलामी दिली आहे. भारताने अभिषेक शर्मा आणि रिंकु सिंह या जोडीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 239 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 190 धावांपर्यंतच मजल मारता आली. यासह भारताने सामना जिंकला. भारताने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताने न्यूझीलंडला लोळवत नागपूरमधील 10 वर्षांआधीच्या पराभवाची अचूक अशी परतफेडही केली.

सामन्याचा धावता आढावा

न्यूझीलंडने टॉस जिंकून यजमान भारताला फलंदाजीची संधी दिली. भारताने या संधीचा जबरदस्त फायदा घेतला. भारताने न्यूझीलंड विरुद्ध आपलाच सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्सच्या मोबदल्यात 238 धावांचा डोंगर उभा केला. भारताला इथवर पोहचवण्यात ओपनर अभिषेक शर्मा आणि फिनिशर रिंकु सिंह या दोघांनी प्रमुख योगदान दिलं. अभिषेकने 84 तर रिंकूने 44* धावा केल्या. त्याशिवाय कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 32 तर हार्दिक पंड्या याने 25 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडसाठी कायले जेमीसन आणि जेकब डफी या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

न्यूझीलंडची बॅटिंग

न्यूझीलंडकडून या विजयी धावांचा पाठलाग करताना ग्लेन फिलिप्स याने सर्वाधिक 78 धावा केल्या. मार्क चॅपमॅन याने 39 धावांचं योगदान दिलं. डॅरेल मिचेल याने 28 आणि टीम रॉबिन्सन याने 21 धावा केल्या. तर कॅप्टन मिचेल सँटनर याने नाबाद 20 धावा केल्या. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर या खेळीचा काहीही फायदा झाला नाही. न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांसमोर 190 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतासाठी वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अर्शदीप सिंह, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल या तिघांनी न्यूझीलंडच्या प्रत्येकी 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

सूर्यासेनेची विजयी सुरुवात

न्यूझीलंडचा नागपूरमध्ये 10 वर्षांनी हिशोब

दरम्यान टीम इंडियाने या विजयासह न्यूझीलंडचा नागपूरमध्ये 10 वर्षांनी हिशोब केला. न्यूझीलंडने भारताला 2016 साली याच मैदानात पराभूत केलं होतं. न्यूझीलंडने तेव्हा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात भारतावर 47 धावांनी मात केली होती.  आता भारताने न्यूझीलंडला 48 धावांनी लोळवत 10 वर्षांआधीच्या पराभवाचा हिशोब केला.