
टीम इंडिया शुक्रवारी 23 जानेवारीला रायपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सलग दुसरा टी 20I सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाने नागपूरमध्ये 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडवर मात करुन विजयी सलामी दिली होती. त्यामुळे टीम इंडिया शुक्रवारी रायपूरमध्ये विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडसमोर विजयाचं खातं उघडण्यासह मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान असणार आहे. नागपूरमध्ये भारतीय फलंदाजांसह-गोलंदाजांनीही कमाल कामगिरी करत न्यूझीलंडचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे किंवीचा रायपूरमध्ये कस लागणार आहे. उभयसंघातील दुसऱ्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? तसेच भारताची रायपूरमधील आकडेवारी कशी आहे? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये अजिंक्य आहे. भारताने या मैदानात खेळलेल्या एकमेव टी 20i सामन्यात विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2023 साली या मैदानात टी 20i सामना खेळवण्यात आला होता. भारताने तेव्हा सूर्यकुमार यादव याच्याच नेतृत्वात हा विजय मिळवला होता. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाला 154 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारताने अशाप्रकारे हा सामना 19 धावांनी हा सामना आपल्या नावावर केला होता.
रायपूरमधील त्या सामन्यात रिंकु सिंह आणि अक्षर पटेल या दोघांनी भारताला विजयी करण्यात निर्णायक योगदान दिलं होतं. रिंकूने 46 धावांची स्फोटक खेळी केली होती. तर अक्षर पटेल याने ऑस्ट्रेलियाला 3 झटके देत झटपट गुंडाळण्यात योगदान दिलं होतं. त्यामुळे आता टीम इंडिया या मैदानात 2023 नंतर पुन्हा एकदा विजय मिळवून मालिकेत 2-0 ने एकतर्फी आघाडी घेण्यात यशस्वी ठरणार की न्यूझीलंड पलटवार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
साधारणपणे विजयी संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला जात नाही. मात्र हा बदल करायचा की नाही? हे सर्वस्वी टीम मॅनेजमेंट आणि कर्णधारावर अवलंबून असतं. आता रायपूरमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमधून कुणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार? असाही प्रश्न आहे. पहिल्या सामन्यात इशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांना काही खास करता आलं नव्हतं. त्यामुळे टीम मॅनेजमेंट या दोघांपैकी कुणालाही बाहेरचा रस्ता दाखवणार की विश्वास दाखवत कायम ठेवणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.