IND vs NZ: टी 20i वर्ल्ड कपआधी भारताच्या डोकेदुखीत वाढ, नागपूरमध्ये असं झालं
India vs New Zealand 1st T20i : सामना जिंकल्यानंतर साधारणपणे टीमकडून किंवा खेळाडूकडून झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष होतं. मात्र भारताच्या 2 फलंदाजांनी नागपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यासह टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढवलं आहे.

टीम इंडिया आगामी वर्ल्ड कप स्पर्धेआधी शेवटची टी 20i मालिका खेळत आहे. टीम इंडियासमोर या 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचं आव्हान आहे. भारताने बुधवारी 21 जानेवारीला न्यूझीलंडवर 48 धावांनी मात करत मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये न्यूझीलंडसमोर 239 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 190 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारताने अशाप्रकारे हा सामना आपल्या नावावर करत नागपुरात सलग आणि एकूण चौथा टी 20i विजय साकारला. भारताच्या या विजयानंतरही चिंतेत वाढ झाली आहे. त्याचं कारण म्हणजे भारताचे टॉप ऑर्डरमधील 2 अपयशी ठरलेले फलंदाज.
नक्की काय झालं?
विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याने नागपूरमधील सामन्यातून टीम इंडियात 2 वर्षांनंतर कमबॅक केलं. त्यामुळे इशानकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची आशा होती. मात्र इशानने निराशा केली. इशानला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तसेच संजू सॅमसन हा देखील नववर्षातील पहिल्याच टी 20i सामन्यात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. संजू 10 धावा करुन माघारी परतला. इशान आणि संजू दोघेही विकेटकीपर आहेत. या दोघांचा टी 20i वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेआधी शेवटच्या मालिकेत दोघांनी अशी सुरुवात केल्याने चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
वर्ल्ड कपआधीची ही शेवटची मालिका असल्याने भारतीय खेळाडूंचा जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे. अशात हे दोघे अपयशी ठरले. दोघेही विकेटकीपर असल्याने वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांमध्ये प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकत्र दिसणार नाहीत हे निश्चित आहे.
इशानकडे शेवटची संधी!
संजू सॅमसन हा टीम मॅनेजमेंटची विकेटकीपर म्हणून पहिली पसंत आहे. तसेच इशानला तिलक वर्मा याच्या जागी स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे तिलक दुखापतीतून परतल्यास त्याचं प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक होणार हे निश्चित आहे. त्यामुळे जर इशानला आपला दावा मजबूत करायचा असेल तर त्याला गेम दाखवण्याशिवाय पर्याय नाही.
इशान आणि संजू दोघेही टॉप ऑर्डरमधील प्रमुख फलंदाज आहे. टॉप ऑर्डरमधील फलंदाजांवर संघाला आक्रमक तसेच किमान चांगली सुरुवात करुन देणं अपेक्षित असतं. मात्र यात संजू आणि इशान दोघेही ढेर ठरले.
संजूला नागपूरमध्ये सुरुवात तर मिळाली होती. मात्र संजू त्या खेळीला मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयशी ठरला. संजूने 2 चौकारांसह एकूण 10 धावा केल्या. तसेच इशाननेही कमबॅकमधील सामन्यात 2 चौकारांच्याच मदतीने 8 धावा जोडल्या. आता हे दोघेही दुसऱ्या सामन्यात नागपूरमधील चूक सुधारणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
