IND vs NZ : न्यूझीलंडचं भारतासमोर विजयासाठी 154 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. न्यूझीलंडने 20 षटकात 9 गडी गमवून 153 धावा केल्या. तसेच विजयासाठी 154 धावांचं आव्हान दिलं.

IND vs NZ : न्यूझीलंडचं भारतासमोर विजयासाठी 154 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jan 25, 2026 | 8:57 PM

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवला नाणेफेकीने साथ दिली. कौल जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि न्यूझीलंडला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण या सामन्यात न्यूझीलंडला 153 धावांवर रोखण्यात यश आलं. न्यूझीलंडने 20 षटकात 9 गडी गमवून 153 धावा केल्या आणि विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं. हा सामना न्यूझीलंडसाठी करो या मरोची लढाई आहे. जर हा सामना गमावला तर ही मालिका 3-0 ने गमवले. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने सुरुवातीचे दोन सामने जिंकले आहेत.

न्यूझीलंडच्या धावगतीला पावरप्लेमध्ये खिळ बसली. कारण पहिल्या षटकातच धक्का बसला. डेवॉन कॉनवे स्वस्तात बाद झाला. त्याला हार्षित राणाने तंबूचा रस्ता दाखवला. तर दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर रचिन रविंद्रची विकेट पडली. त्यानंतर न्यूझीलंडनं पावर प्लेमध्ये सावरण्याचा प्रयत्न केला. पण सूर्यकुमार यादवने पावर प्लेचं शेवटचं षटक जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टिम सायपर्टच्या दांड्या बुमराहने उडवल्या. त्यामुळे न्यूझीलंडसाठी पावर प्लेची सहा षटकं काही चांगली गेली नाही. 6 षटकात न्यूझीलंडने 3 विकेट गमवून 36 धावा केल्या.

मार्क चॅपमन आणि ग्लेन  फिलिप्सने पुढच्या चार षटकात डाव सावरला. या जोडीने पुढच्या चार षटकात 39 धावा जोडल्या. त्यामुळे 10 षटकात 3 गडी बाद 75 धावा अशी स्थिती झाली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात रवि बिश्नोईला यश आलं. त्याच्या गोलंदाजीवर मार्क चॅपमन 32 धावा करून संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन बाद झाला.

न्यूझीलंडची पाचवी विकेट हार्दिक पांड्या हाती लागली. न्यूझीलंडच्या 112 धावा असताना हार्दिक पांड्याने डॅरेल मिचेलला तंबूचा रस्ता दाखवला. डॅरेल मिचेल 8 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्यामुळे धावगतीला ब्रेक बसला. ग्लेन फिलिप्स तरीही भारतीय संघाला डोकेदुखी ठरत होता. पण पुढच्याच षटकात रवि बिश्नोईने त्याला चालता केला. त्याच्या चेंडूवर फिलिप्स जोरदार फटका मारला, पण झेल बाद झाला.

भारताकडून 18वं षटक जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवलं गेलं. या षटकात न्यूझीलंडची सातवी विकेट जसप्रीत बुमराहने काढली. कायल जेमिसनचा त्रिफळा उडवला आणि त्याला अवघ्या 3 धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर एक चेंडू झाला आणि पुढच्याच चेंडूवर मॅट हेन्री धावचीत झाला.  या षटकात जसप्रीत बुमराहने फक्त 3 धावा दिल्या. शेवटचं षटक जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मिचेल सँटनरला बाद केला.