IND vs NZ : आणखी काय करायला पाहिजे होतं? ऋतुराज गायकवाडला शेवटच्या सामन्यात शतक करुनही डच्चू, Bcci च्या निर्णयामुळे चाहत्यांचा संताप
Ruturaj Gaikwad IND vs NZ Odi Series 2026 : बीसीसीआयच्या एका निर्णयामुळे चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. निवड समितीने गेल्या सामन्यात शतक करणाऱ्या ऋतुराज गायकवाड याला एकदिवसीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवलाय.

बीसीसीआय निवड समितीने शनिवारी 3 जानेवारीला न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 11 जानेवारीपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या या मालिकेतून भारतीय संघात दुखापतग्रस्त आणि प्रमुख खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. तसेच निवड समितीने काही खेळाडूंना संधी दिली आहे.सोबतच काही खेळाडूंना वगळलं आहे. त्यामुळे चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यानिमित्ताने आपण निवड समितीने कुणाला संधी दिलीय आणि कुणाला वगळलंय? हे जाणून घेऊयात.
कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर या दोघांचं दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन झालंय. मात्र श्रेयसला खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. या फिटनेस टेस्टवर श्रेयसचं भवितव्य अवलंबून असणार आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचं संघात कमबॅक झालंय. तर निवड समितीने भारताच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक करणाऱ्या ऋतुराज गायकवाड याला वगळलं आहे. त्यामुळे चाहत्यांनाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ऋतुराजचा रायपूरमध्ये शतकी तडाखा
ऋतुराजला दक्षिण आफ्रेकिविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करुनही वगळण्यात आलंय. ऋतुराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रायपूरमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक केलं होतं. ऋतुराजने 83 बॉलमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाने 271 धावांचं आव्हान हे 1 विकेट गमावून पूर्ण केलं. त्यामुळे ऋतुराजला तिसऱ्या सामन्यात बॅटिंगची संधी मिळाली नाही.
ऋतुराजला एका मालिकेनंतर वगळलं
ऋतुराजचं नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय संघात जवळपास 2 वर्षांनंतर कमबॅक झालं होतं. ऋतुराजचा श्रेयस अय्यर याच्या जागी समावेश करण्यात आला होता. ऋतुराज त्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 8 धावांवर बाद झाला. मात्र त्याने दुसऱ्या सामन्यात कमबॅक करत शतक झळकावलं होतं. मात्र ऋतुराजला श्रेयसच्या जागी संधी मिळाली होती. त्यामुळे श्रेयसच्या कमबॅकनंतर ऋतुराजला वगळण्यात येणार असल्याचं नक्की होतं. आता तसंच झालंय.
ऋतुराजला निवड समितीकडून डच्चू
Ruturaj Gaikwad in his last ODI Innings – Hundred.
– No place in the next series 🤯
A Big decision by the Selectors. pic.twitter.com/inEW93qA18
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2026
तसेच ऋतुराज व्यतिरिक्त ध्रुव जुरेल आणि तिलक वर्मा या दोघांनाही निवड समिताने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आता या सर्व खेळाडूंना संघात संधी मिळवण्यासाठी आणखी जोरदार कामिगरी आणि प्रतिक्षा करावी लागणार आहे.
