प्लेइंग 11 मधून आतबाहेर असण्यावरून अर्शदीप सिंगने दिली प्रतिक्रिया, संघ व्यवस्थापनाची फिरकी घेत म्हणाला..

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात अभिषेक शर्माने जबरदस्त कामगिरी केली. तर अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात कमाल केली. या सामन्यानंतर अर्शदीपने मन मोकळं केलं.

प्लेइंग 11 मधून आतबाहेर असण्यावरून अर्शदीप सिंगने दिली प्रतिक्रिया, संघ व्यवस्थापनाची फिरकी घेत म्हणाला..
प्लेइंग 11 मधून आतबाहेर असण्यावरून अर्शदीप सिंगने दिली प्रतिक्रिया
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 22, 2026 | 7:29 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडला 48 धावांनी पराभूत केलं. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि न्यूझीलंडवर दबाव वाढवला. त्याने 4 षटकं टाकली आणि 31 धावा दिल्या. असं असलं तरी न्यूझीलंडची फटकेबाजी पाहता अर्शदीपची गोलंदाजी प्रभावी ठरली. पण अर्शदीप सिंगची प्लेइंग 11 मधील जागा काही पक्की नाही. टीम कॉम्बिनेशन आणि बॅटिंग ऑर्डरचं गणित जुळवताना अनेकदा अर्शदीपला प्लेइंग 11 मधून डावललं जातं. त्यामुळे कधी प्लेइंग 11 मध्ये, तर कधी प्लेइंग 11 च्या बाहेर असतो. यावर अर्शदीप सिंगने मन मोकळं केलं. पत्रकार परिषदेत त्याला याबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर संघ व्यवस्थापनाची फिरकी घेत प्रतिक्रिया दिली.

अर्शदीप सिंगने पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘ज्या पद्धतीने मी टीमच्या आत बाहेर असतो, तसाच माझा चेंडू आत बाहेर होत असतो. यासाठी मला खूप मज्जा येते.’ अर्शदीप सिंगने प्लेइंग 11 मधून आतबाहेर असूनही आत्मविश्वास कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. प्लेइंग 11 मध्ये नसलो तरीक्षमतेवर काही फरक पडत नाही, हे सिद्ध केलं आहे. अर्शदीप सिंगने 73 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 111 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीप सिंगने सांगितलं की त्याचं काम फक्त तयार राहणं आहे. ‘संघ जेव्हा नव्या किंवा जुन्या चेंडूने गोलंदाजी करण्याची जबाबदारी दिली जाईल. तेव्हा मी सर्वश्रेष्ठ देईन. माझा लक्ष्य फक्त ज्या गोष्टी नियंत्रणात आहे त्याकडे असेल.’

अर्शदीप सिंगने न्यूझीलंडविरुद्ध एक विकेट घेतली. पण त्याने शाहीन शाह आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला. अर्शदीप सिंग भारतासाठी पहिलं किंवा दुसरं षटक टाकतो. या दोन षटकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 विकेट घेतल्या आहेत. तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि युएईचा गोलंदाज जुनैद सिद्दकी 27 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहेत. अर्शदीप सिंग 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करू शकलेला नाही. भारताने 2025 या वर्षात एकूण 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. पण यापैकी फक्त 13 सामन्यात अर्शदीप सिंग प्लेइंग 11 चा भाग होता. या फॉर्मेटमध्ये प्रभावशाली गोलंदाजी करूनही आशिया कप स्पर्धेतील बहुतांश सामन्यातून डावलण्यात आलं.