सरफराज खानचं पुन्हा एकदा कडक उत्तर, रणजी ट्रॉफीत निवड समितीला दाखवून दिलं
भारताचा फलंदाज सरफराज खान याने फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. टीम इंडियातून वारंवार डावलण्याऱ्यांना चोख उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटसाठी सरफराज खानचा विचार करणं भाग पडणार आहे. पण त्यासाठी बराच अवकाश आहे.

सरफराज खान हे नाव गेल्या काही वर्षात चर्चेत आहेत. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली. त्याला संघात संधीही मिळाली, पण त्यानंतर त्याला संघात पुन्हा स्थान मिळवणं कठीण झालं. आता सरफराज खानने पुन्हा एकदा निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत सरफराज खानची बॅट चांगलीच तळपली. त्याने मुंबईकडून खेळताना हैदराबादविरुद्ध खणखणीत शतक ठोकलं. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्री मैदानात सुरु असलेल्या सामन्यात त्याने आपल्या शतकाने मुंबईला तारलं. मुंबईच्या 82 धावांवर 3 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर कर्णधार सिद्धेश लाडसोबत फलंदाजीला सरफराज खान उतरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 249 धावांची भागीदारी केली. यात सरफराज खानने झंझावाती शतक ठोकलं.
मुंबई संघाला नाजूक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सरफराज खानने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. त्याने 120 चेंडूत शतक पूर्ण केलं. यात त्याने 9 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यामुळे मुंबईने पहिल्या दिवशी 300 पार धावा केल्या. सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवला आहे. 61 सामन्यात त्याने 17वं शतक ठोकलं आहे. इतकंच काय तर 16 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. सरफराजची खेळी पाहता मोठी धावसंख्या करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याच्या फलंदाजीची सरासरीही 60 च्या वर आहे. पण असं असूनही त्याला संघात जागा मिळणं कठीण झालं आहे.
सरफराज खानने रणजी स्पर्धेतच नाही. टी20 आणि वनडे स्पर्धेतही फलंदाजीची जादू दाखवली आहे. डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने शतक ठोकलं होतं. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी गोव्याविरूद्ध 157 धावांची आक्रमक खेळी केली होती. आता रणजी ट्रॉफीतही त्याने शतक ठोकून सिद्ध केलं आहे. त्याचा हा फॉर्म पाहता टीम इंडियाला नक्कीच फायदा होऊ शकतो. पुढच्या 12 महिन्यात भारतीय आशियामध्ये 8 कसोटी सामने खेळणार आहे. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेतही सरफराज खानला संधी मिळाली आहे. आता भारतीय संघ थेट ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या संघात जागा मिळेल की नाही आताच सांगणं कठीण आहे.
