IND vs PAK : WCL 2025 नंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील 4 सामनेही रद्द होणार?

India vs Pakistan Cricket Match : सर्वच स्तरातील वाढत्या विरोधानंतर वर्ल्ड चॅम्पियन्शीप ऑफ लिजेंड्स 2025 स्पर्धेतील 2 सामने रद्द करण्यात आले. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 4 सामने रद्द होणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

IND vs PAK : WCL 2025 नंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील 4 सामनेही रद्द होणार?
India vs Pakistan Cricket Match
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 30, 2025 | 11:43 PM

इंडिया चॅम्पियन्स संघाने वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2025 स्पर्धेदरम्यान मोठा निर्णय घेतला. इंडिया चॅम्पियन्सने उपांत्य फेरीत पोहचल्यानंतर या स्पर्धेतून माघार घेतली. भारताचा या स्पर्धेतील उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध सामना होणार होता. मात्र भारताने या सामन्यावर बहिष्कार घातला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही शेजाऱ्यांमध्ये संघर्ष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स स्पर्धेतील उपांत्य फेरीत न खेळण्याचा निर्णय घेतला. भारताने याआधी या स्पर्धेतील साखळी फेरीतही पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता भारत-पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सामनेही रद्द होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील 4 सामने रद्द?

बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. उभयसंघात साखळी फेरीत 14 सप्टेंबरला सामना होणार आहे. तसेच दोन्ही संघात सुपर 4 मध्ये सामना होऊ शकतो. तसेच दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहचल्यास महामुकाबला होऊ शकतो. अशाप्रकारे दोन्ही संघात किमान 1 सामना होणार असल्याचं निश्चित आहे. तर त्यानंतर 2 सामने होण्याची शक्यता आहे. मात्र आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, असा सूर क्रिकेट चाहत्यांचा आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामने रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसऱ्या बाजूला 30 सप्टेंबरपासून आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला 30 सप्टेंबरला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतही दोन्ही क्रिकेट संघात सामना होणार आहे. हा सामना 5 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. तसेच दोन्ही संघ बाद फेरीत पोहचल्यास एकमेकांविरुद्ध एकापेक्षा अधिक सामने होऊ शकतात.

Wpl 2025 मधील 2 सामने रद्द

दरम्यान वर्ल्ड चॅम्पियन्शीप ऑफ लिजेंड्स 2025 स्पर्धेत इ़ंडिया चॅम्पियन्सचा या मोहिमेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार होता. मात्र वाढता विरोध आणि खेळाडूंनी बहिष्कार घातल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला होता. शिखर धवन, हरभजन सिंह, इरफान पठाण आणि युसूफ पठाण या आणि अनेक भारतीय खेळाडूंनी या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला.