पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये एक बदल शक्य, कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या
चॅम्पियन्स ट्रॉफीतील हायव्होल्टेज सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानने हा सामना गमावला तर बाहेरचा रस्ता आणि भारताने जिंकला तर उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होणार आहे.

भारत पाकिस्तान हा क्रिकेट सामना युद्धापेक्षा काही कमी नाही. सामना म्हंटलं की क्रीडाप्रेमी प्रत्येक चेंडूचं बारकाईने निरीक्षण करतात. त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंवर खूपच दडपण असतं. कारण पराभवामुळे दोन्ही देशाचे चाहते आक्रमक होतात. यापूर्वी अनेकदा क्रिकेटपटूंच्या घरांची तोडफोडदेखील झाली आहे. अशा सर्व वातावरणात टीम इंडियात कोणत्या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरेल याची उत्सुकता आहे. महत्त्वाच्या सामन्यात टीम इडिया संघात एक बदल करण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात कुलदीप यादवने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. उलट त्याच्यापेक्षा फिरकीत अक्षर पटेल चांगला पर्याय ठरला. त्यामुळे पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात त्याला वगळून अर्शदीप सिंग किंवा वरुण चक्रवर्ती यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यातही अर्शदीप सिंगला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या होत्या. तर हार्षित राणाने 3 विकेट घेतल्या होत्या. म्हणजेच दुबईतील खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना मदत केली हे दिसत आहे.
बांगलादेशला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा याच मैदानावर पाकिस्तानशी सामना करण्यास सज्ज आहे. त्यामुळे भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. शुबमन गिल आणि रोहित शर्मा ओपनिंगला, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर उतरेल. केएल राहुल यष्टीरक्षक-फलंदाज, तर रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल अष्टपैलू असतील.मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. भारताने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरी गाठेल. पण गमावला तर मात्र न्यूझीलंडविरुद्धचा सामना काहीही करून जिंकावा लागेल. पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. जिंकला तर स्पर्धेतील आव्हान बांगलादेशविरुद्धच्या निकालावर अवलंबून असेल.
पाकिस्तानविरुद्ध अशी असू शकते प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.
