IND vs PAK : अभिषेक-शुबमनचा धमाका, टीम इंडियाचा 6 विकेट्सने कडक विजय, पाकिस्तानला पुन्हा लोळवलं

India vs Pakistan Super 4 Asia Cup 2025 Match Result : पाकिस्तानने टीम इंडियाला 172 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान सहज पूर्ण केलं.

IND vs PAK : अभिषेक-शुबमनचा धमाका, टीम इंडियाचा 6 विकेट्सने कडक विजय, पाकिस्तानला पुन्हा लोळवलं
Abhishek Sharma and Shubman Gill IND vs PAK
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Sep 22, 2025 | 12:45 AM

टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी झंझावात कायम ठेवत पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली आहे. भारताने
साखळी फेरीनंतर सुपर 4 मध्येही पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दणदणीत विजय साकारला. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 7 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने 18.5 ओव्हरमध्ये 174 धावा करत सामना 6 विकेट्सने जिंकला. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या या तिघांनीही बॅटिंगने योगदान दिलं.

भारताची अप्रतिम सुरुवात

शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने भारताला 172 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात करुन दिली. या दोघांनी जोरदार फटकेबाजी करत शतकी भागीदारी केली. अभिषेकने या भागीदारीदरम्यान 24 चेंडूत अर्धशतक ठोकलं. दोघेही मारत सुटले होते. त्यामुळे भारत हा सामना झटपट जिंकेल असं वाटलं होतं. मात्र फहीम अश्रफ याने ही सेट जोडी फोडली. शुबमनच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. मात्र तोवर शुबमनने आपली जबाबदारी पार पाडली होती. पाकिस्तानने 105 धावांवर भारताला पहिला झटका दिला. शुबमनने 28 बॉलमध्ये 8 फोरसह 47 रन्स केल्या.

सूर्या झिरोवर आऊट

शुबमननंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानी मैदानात आला. मात्र सूर्या भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. सूर्या त्याच्या खेळीतील तिसऱ्या बॉलवर आऊट झाला. हरीस रौफ याने सूर्याला अब्रार अहमद याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे भारताने 105-0 वरुन 106-2 असा स्कोअर झाला.

सूर्या आऊट झाल्यानंतर अभिषेकची साथ देण्यासाठी तिलक वर्मा मैदानात आला. मात्र पाकिस्तानने अवघ्या काही धावांनंतर भारताला तिसरा झटका दिला. पाकिस्तानला मोठी विकेट मिळाली. भारताने अभिषेक च्या रुपात तिसरी विकेट गमावली. अब्रार अहमद याने अभिषेकला हरीस रौफच्या हाती कॅच आऊट केलं. अभिषेकने 39 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 6 फोरसह सर्वाधिक 74 रन्स केल्या.

अभिषेकनंतर संजू सॅमसन मैदानात आला. तिलक आणि संजूने चौथ्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी केली. संजू 13 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर तिलक आणि हार्दिक या जोडीने नाबाद 26 धावांची भागीदारी करत भारताला विजयापर्यंत पोहचवलं. तिलकने 19 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 30 रन्स केल्या. तर हार्दिकने 7 धावांचं योगदान दिलं. पाकिस्तानसाठी हरीस रौफ याने 2 विकेट्स मिळवल्या. तर अब्रार अहमद आणि फहीम अश्रफ या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाचा विजयी चौकार

पाकिस्तानची बॅटिंग

दरम्यान त्याआधी भारताने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने पाकिस्तानच्या फलंदाजांना 4 योगदान दिले. मात्र त्यानंतरही भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 180 पर्यंत पोहचू दिलं नाही. पाकिस्तानला भारतासमोर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 171 धावाच करता आल्या. पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहाने याने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर भारतीय गोलंदाजांनी इतरांना मोठी खेळी करण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. भारतासाठी शिवम दुबे याने दोघांना बाद केलं. तर हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.