
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. भारताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 159 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्करम याने सर्वाधिक 31 धावा केल्या. तर भारतासाठी जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर टीम इंडियाने 159 धावांच्या प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 20 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 37 धावा केल्या. टीम इंडिया 122 धावांनी पिछाडीवर आहे. केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी नाबाद परतली. तर यशस्वी जैस्वाल याच्या रुपात भारताने एकमेव विकेट गमावली. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवून मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी भारतीय फलंदाजांवर असणार आहे.
भारताने 159 धावांच्या प्रत्युत्तरात सावध सुरुवात केली. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने संयमी खेळ दाखवला. यशस्वीने सेट होण्यासाठी थोडा वेळ घेतला. यशस्वीने त्यानंतर काही फटके मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्को यान्सन याने यशस्वीला बोल्ड केलं. यशस्वीने 12 धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद परतली. केएलने 13 आणि सुंदरने 6 धावा केल्या.
कोलकातामधील इडन गार्डन्समधील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी पोषक आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेकडे सायमन हार्मर आणि केशव महाराज यासारखे अनुभवी आणि कसेलेले फिरकीपटू आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांपुढे या फिरकीपटूंसमोर धावा करण्याचं आव्हान असणार आहे.
दरम्यान त्याआधी भारतीय गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला 160 धावांच्या आत रोखलं. भारताने दक्षिण आफ्रिकेला 55 ओव्हरमध्ये 159 रन्सवर ऑलआऊट केलं. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आलं नाही. एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मारक्रमने 31 धावा केल्या. तर एडनशिवाय एकालाही 30 धावाही करता आल्या नाहीत. जसप्रीत बुमराह याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्यांदा 5 विकेट्स घेतल्या. तर इतरांनी चांगली साथ दिली.
मियाँ मॅजिक अर्थात मोहम्मद सिराज आणि चायनामॅन बॉलर कुलदीप यादव या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल याने 1 विकेट मिळवली.