SA vs IND : जसप्रीत बुमराहचा पंजा आणि दक्षिण आफ्रिकेचं पॅकअप, टीम इंडियाने 159 रन्सवर गुंडाळलं
India vs South Africa 1st Test : भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने आपल्या धारदार बॉलिंगच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच इतर गोलंदाजांनीही बुमराहला चांगली साथ दिली.

टीम इंडियाने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला इडन गार्डन्समधील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी (India vs South Africa 1st Test) गुंडाळलं आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या सत्रात 55 षटकांमध्ये 159 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेला झटपट ऑलआऊट करण्यात वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक योगदान दिलं. तसेच फिरकीपटूंनी निर्णायक भूमिका बजावली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दक्षिण आफ्रिकेचं कंबरडं मोडलं. बुमराहने केशव महाराज याला एलबीडब्ल्यू आऊट केलं आणि दक्षिण आफ्रिकेचं पॅकअप केलं. बुमराहने यासह 5 विकेट्स (Jasprit Bumrah Fifer) घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
दक्षिण आफ्रिकेसाठी ओपनर एडन मारक्रम याने सर्वाधिक धावा केल्या. मारक्रमने 31 धावांचं योगदान दिलं. मारक्रम व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 25 पारही पोहचता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी वियान मुल्डर आणि टॉनी डी झॉर्झी या दोघांनी प्रत्येकी 24-24 धावा जोडल्या. ओपनर रायन रिकेल्टन याने 23 रन्स केल्या. काइल वेरेन याने 16 रन्स केल्या. तर ट्रिस्टन स्टब्स याने नाबाद 15 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन टेम्बा बावुमा याने 3 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तिघांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. तर मार्को यान्सेन आणि केशव महाराज या दोघांना भोपळाही फोडता आला नाही.
जसप्रीत बुमराहचा पंजा
𝘽𝙤𝙬𝙡𝙞𝙣𝙜 𝘽𝙡𝙞𝙩𝙯 🔥
Jasprit Bumrah was on a roll at the Eden Gardens ⚡️
Watch his outstanding spell ▶️ https://t.co/If1vSkt7ec#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/01QZZn3d0w
— BCCI (@BCCI) November 14, 2025
जसप्रीत बुमराहने एडन मारक्रम, रायन रिकेल्टन,टॉनी डी झॉर्झी, सायमन हार्मर आणि केशव महाराज या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. बुमराहने 14 ओव्हर बॉलिंग केली. त्यापैकी 5 मेडन ओव्हर टाकल्या. बुमराहने 27 रन्सच्या मोबदल्यात 5 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अक्षर पटेल याने 1 विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला ऑलआऊट करण्यात योगदान दिलं.
जसप्रीत बुमराह याची कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही 16 वी तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकूण चौथी वेळ ठरली. तसेच बुमराहची ही दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. बुमराहची 61 धावांमध्ये 6 विकेट्स ही दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहने 2024 साली केपटाऊनमध्ये दुसऱ्या डावात हा कारनामा केला होता.
आता फलंदाजांवर मदार
दरम्यान गोलंदाजांनी पाहुण्या संघाला झटपट गुंडाळून ऑलआऊट केल्यानंतर आता भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात जास्तीत जास्त धावा करुन मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
