Temba Bavuma : कॅप्टन टेम्बा बवुमा याचा दबदबा कायम, 12 पैकी किती कसोटी सामने जिंकलेत?

Temba Bavuma Captaincy Record : टेम्बा बवुमा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान दौऱ्यात 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राखली. त्यानंतर टेम्बाने दक्षिण आफ्रिकेला भारतात कसोटी मालिकेत 2-0 असा एकतर्फी आणि ऐतिहासिक फरकाने विजय मिळवून दिला.

Temba Bavuma : कॅप्टन टेम्बा बवुमा याचा दबदबा कायम, 12 पैकी किती कसोटी सामने जिंकलेत?
Temba Bavuma
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 26, 2025 | 10:25 PM

टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि फलंदाज टेम्बा बवुमा याच्या उंचीवरुन भाष्य केलं होतं. जसप्रीतने टेम्बावाचा बुटका असा उल्लेख केला होता. जसप्रीतचा तसं म्हणण्यामागे वाईट हेतू नसेलही. मात्र याच टेम्बाने दक्षिण आफ्रिकेला भारतात तब्बल 25 वर्षांनंतर त्याच्या नेतृत्वात भारतात कसोटी मालिका जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. टेम्बाने यासह तो वर्ल्ड चॅम्पियन संघाचा कर्णधार का आहे? हे सिद्ध करुन दाखवलं.

दक्षिण आफ्रिकेने भारतावर कोलकातातील इडन गार्डन्समध्ये झालेल्या सामन्यात 30 धावांनी मात केली होती. टेम्बाने दक्षिण आफ्रिकेसाठी आव्हानात्मक खेळपट्टीवर सर्वाधिक धावांची खेळी केली. टेम्बाने अर्धशतक झळकावलं होतं. टेम्बाच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला भारतासमोर 124 धावांचं आव्हान ठेवता आलं. त्यांनतर दक्षिण आफ्रिकेने भारताला 93 धावांवर ऑलआऊट करत हा सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात टेम्बाची ही खेळी निर्णायक ठरली. दक्षिण आफ्रिकेने भारतावर तिसऱ्याच दिवशी विजय साकारला होता.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी 26 नोव्हेंबरला भारताचा 408 धावांनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने यासह भारताला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. तसेच टेम्बाने यासह इतिहास घडवला. टेम्बा दक्षिण आफ्रिकेला 2000 नंतर भारतात कसोटी मालिका जिंकून देणारा पहिला कर्णधार ठरला. तसेच टेम्बाने अवघ्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेला टेस्ट वर्ल्ड कप जिंकून दिला होता.

टेम्बाची कर्णधार म्हणून आकडेवारी

टेम्बाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत एकही कसोटी गमावलेला नाही. टेम्बा अजिंक्य कर्णधार आहे. टेम्बाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचं 12 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. टेम्बाने 12 पैकी 11 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं आहे. तर एकमेव सामना हा अनिर्णित राहिला आहे.

भारताचा सर्वात मोठा पराभव

दरम्यान टीम इंडियाचा गुवाहाटीत 408 धावांनी झालेला कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव ठरला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताला 201 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 288 धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव 260 धावांवर घोषित केला. त्यामुळे भारताला विजयासाठी 549 धावांचं अवघड आव्हान मिळालं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताला 140 धावांवर गुंडाळलं आणि सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवला.