IND vs SA : भारताचा दुसऱ्या कसोटीत 408 धावांनी धुव्वा, दक्षिण आफ्रिकेचा 2-0 ने ऐतिहासिक विजय
India vs South Africa 2nd Test Match Result : भारतीय कसोटी क्रिकेट संघाने मायदेशात नाक कापलं आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-0 अशा फरकाने व्हाईटवॉश केलं आहे.

भारतीय कसोटी क्रिकेट संघाला इतिहासातील सर्वात वाईट आणि मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममधील दुसर्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी तब्बल 408 धावांनी धुव्वा उडवला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी 549 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला 140 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेचा हा टीम इंडिया विरुद्धचा सलग दुसरा विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेने यासह भारताला 2-0 अशा फरकाने व्हाईटवॉश केलं आहे. भारताला ऋषभ पंत याच्या नेतृत्वात या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर भारतीय टीम आणि मॅनेजमेंटवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा 25 वर्षांनतर भारतात मालिका विजय
दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीतील कसोटी विजयासह 25 वर्षांची प्रतिक्षा संपवली. दक्षिण आफ्रिकेने कोलकातात टीम इंडियावर मात करत भारतात 15 वर्षांनंतर कसोटी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने त्यानंतर आता दुसरा सामना जिंकून 2000 नंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने 2000 साली भारताला 2-0 ने पराभूत केलं होतं.
दक्षिण आफ्रिकेच्या 489 धावा
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिल्या डावात 489 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी सेनुरन मुथुसामी याने सर्वाधिक धावा केल्या. सेनुरन याने 109 धावा केल्या. तर मार्को यान्सेन याने 93 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा या तिघांनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसमोर ढेर
टीम इंडियाचे फलंदाज पहिल्या डावात ढेर झाले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारताला फक्त 201 धावाच करता आल्या. पहिल्या डावात भारतासाठी यशस्वी जैस्वाल याने सर्वाधिक 58 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर याने 48 धावांचं योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त भारताकडून एकालाही 40 पार पोहचता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को यान्सेन याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. सायमन हार्मर याने 3 विकेट्स मिळवल्या. तर केशव महाराज याने 1 विकेट घेत दोघांना चांगली साथ दिली.
पाहुण्या संघाला 288 धावांची आघाडी
भारताला 201 वर ऑलआऊट केल्याने दक्षिण आफ्रिकेला 288 धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसर्या डावात 250 पेक्षा अधिक धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने दुसरा डाव 260 धावांवर घोषित केला. त्यामुळे भारताला 549 धावांचं आव्हान मिळालं. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताचा 140 धावांवर खुर्दा उडवला. भारतासाठी दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 54 धावांचं योगदान दिलं. त्या व्यतिरिक्त एकालाही 20 पार पोहचता आलं नाही.
भारताचा भारतातच मालिका पराभव
South Africa win the 2nd Test by 408 runs.
They also clinch the #INDvSA Test Series by 2-0.
Scorecard ▶️ https://t.co/Hu11cnrocG#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/NBSFW4xtxP
— BCCI (@BCCI) November 26, 2025
दक्षिण आफ्रिकेसाठी दुसऱ्या डावात सायमन हार्मर याने 6 विकेट्स मिळवल्या. केशव महाराज याने दोघांना बाद केलं. तर मार्को यान्सेन आणि सेनुरन मुथुसामी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
