IND vs SA 2nd Test : दुसरा दिवसही दक्षिण आफ्रिकेच्याच नावावर, टीम इंडिया 480 धावांनी पिछाडीवर

India vs South Africa 2nd Test Day 2 Stumps Highlights : गुवाहाटीत आयोजित दुसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या फलंदाजांनी भारताला चांगलंच झुंजवलं. शेपटीच्या फलंदाजांनी निर्णायक खेळी करत दक्षिण आफ्रिकेला 489 धावांपर्यंत पोहचवलं.

IND vs SA 2nd Test : दुसरा दिवसही दक्षिण आफ्रिकेच्याच नावावर, टीम इंडिया 480 धावांनी पिछाडीवर
Yashasvi Jaiswal and KL Rahul
Image Credit source: Bcci
| Updated on: Nov 23, 2025 | 8:37 PM

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ऑलआऊट 489 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 9 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामी जोडी नाबाद परतली आहे. यशस्वी 7 तर केएल 2 धावा करुन नाबाद परतला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 6 विकेट्स गमावून 247 धावा केल्या होत्या. तर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवशी 4 विकेट्सच्या मोबदल्यात 242 धावा केल्या. शेपटीच्या फलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला 489 धावांपर्यंत मजल मारता आली.

दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग

दक्षिण आफ्रिकेसाठी मुळ भारतीय वंशाचा असलेला सुनेरन मुथुसामी आणि मार्को यान्सेन या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. मुथुसामी याने शतकी खेळी केली. मुथुसामीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक हे भारताविरुद्ध झळकावलं. मुथुसामीने 206 चेंडूत 109 धावा केल्या. तर मार्को यान्सेन याने टेस्टमध्ये वनडे स्टाईल खेळी केली. यान्सेनने 6 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 93 धावांची विस्फोटक खेळी केली.

त्याआधी टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही मोठी खेळी साकारता आली नाही. एडन मार्रक्रम याने 38 तर रायन रिकेल्टन याने 35 धावांचं योगदान देत दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करुन दिली. मार्रक्रम आणि रिकेल्टन या दोघांनी 82 धावांची सलामी भागीदारी केली.

दक्षिण आफ्रिकेच्या शेपटीने भारताला झुंजवलं

ट्रिस्टन स्टब्स याचं अर्धशतक 1 धावेने हुकलं. स्टब्स 49 धावांवर आऊट झाला. कॅप्टन टेम्बा बावुमा याने 41 धावांची खेळी केली. स्टब्स आणि कॅप्टन टेम्बा बावुमा या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेसाठी शतक करणारा मुथुसामी सातव्या स्थानी बॅटिंगला आला. मुथुसामीने सातव्या विकेटसाठी कायले वेरेन याच्यासह 88 धावांची भागीदारी केली. वेरेनने 45 धावा केल्या. त्यानंतर मुथुसामी आणि मार्को यान्सेन या दोघांनी आठव्या विकेटसाठी 97 धावांची निर्णायक भागीदारी केली. या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला 400 पार पोहचता आलं.

तर टीम इंडियासाठी पहिल्या डावात 6 विकेट्स या फिरकी जोडीने घेतल्या. कुलदीप यादव याने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने 2 विकेट्स मिळवल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.