IND vs SA, 2nd Test: पहिला दिवस दक्षिण अफ्रिकेच्या नावावर, 6 गडी गमवून केल्या 247 धावा
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना गुवाहाटीच्या बरसापरा क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या दिवशी 6 गडी गमवून 247 धावा केल्या.

भारत आणि दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना गुवाहाटीत सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. कर्णधार टेम्बा बावुमाने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजी स्वीकारली. खेळपट्टीचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतल्याचं बावुमाने सांगितलं. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या कसोटी पहिल्या दिवशी तशीच रणनिती आखली होती. फलंदाजांनी अमलबजावणी केली. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 81.5 षटकांचा सामना करत 6 गडी गमवून 247 धावा केल्या. अजूनही दक्षिण अफ्रिकेच्या हाती 4 विकेट आहेत. त्यामुळे दुसर्या दिवशी 300 पार धावा होतील असा क्रीडाप्रेमींचा अंदाज आहे. जर तसं झालं तर भारताला मालिका जिंकणं कठीण जाईल. भारताला पहिल्या डावात 600 धावा करण्याची गरज भासेल. तरच सामन्यावर पकड निर्माण होईल.
भारताकडून कुलदीप यादवची फिरकी प्रभावी ठरली. त्याने तीन जणांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 17 षटकात 48 धावा देत 3 गडी तंबूत पाठवले. यात रियान रिकलटन, ट्रिस्टन स्टब्स आणि वियान मुल्डरला बाद केलं. तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दक्षिण अफ्रिकेकडून मोठी खेळी तर कोणी केली नाही. पण आश्वासक सुरुवात आणि दुहेरी आकडे गाठले आहेत. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला 247 धावांपर्यंत मजल मारता आली.
दक्षिण अफ्रिकेने पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. 27 षटकापर्यंत पहिल्या विकेटसाठी भारतीय गोलंदाजांना झुंज द्यावी लागली. जसप्रीत बुमराहने एडन मार्करमला बाद केलं. त्याने 81 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. त्यानंतर कुलदीप यादवने दुसरा झटका दिला आणि टीम इंडियाला ट्रॅकवर आणलं. पुन्हा तिसऱ्या विकेटसाठी स्टब्स आणि टेम्बा बावुमा यांच्या 84 धावांची भागीदारी झाली. रवींद्र जडेजाने बावुमाला मैदानात पाठवलं आणि टीम इंडियाच्या जीवात जीव आला. बावुमा 92 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सेनुरन मुथुसामी नाबाद 25, तर कायल व्हेरेन नाबाद 1 धावांवर खेळत आहे. आता उर्वरित 4 गडी पहिल्या सत्रात झटपट बाद करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे.
