
दक्षिण आफ्रिकेने यजमान टीम इंडियाला दुसऱ्या कसोटीतील पाचव्या दिवशी पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने भारतावर ऐतिहासिक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने भारताचा 408 धावांनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने यासह 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकली. भारताचा हा मायदेशातील गेल्या 3 कसोटी मालिकांमधील एकूण दुसरा व्हाईटवॉश ठरला. भारताला दक्षिण आफ्रिकेआधी न्यूझीलंडने 2024 साली 3-0 ने पराभूत केलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटीत भारताचं नक्की कुठे चुकलं? भारताच्या या पराभवाची 5 कारणं जाणून घेऊयात.
टीम इंडियाने या सामन्यात टेस्ट स्पेशालिस्ट खेळाडूंऐवजी ऑलराउंडर्सना प्राधान्य दिलं. भारताचा प्रमुख खेळाडूंऐवजी ऑलराउंडर्सना संधी देण्याचा प्रयोग फसला. टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर होते. मात्र त्यानंतरही नितीश कुमार रेड्डी याला संधी देण्यात आली. नितीशऐवजी फलंदाजाचा समावेश करता आला असता. मात्र टीम मॅनेजमेंटने फलंदाजाऐवजी ऑलराउंडरला प्राधान्य दिलं.
चेतेश्वर पुजारा तिसऱ्या स्थानी खेळायचा. मात्र पुजारानंतर आतापर्यंत एकाही फलंदाजाला तिसऱ्या स्थानी आपला दावा मजबूत करता आलेला नाही. त्यामुळे टीम मॅनजमेंटकडून सातत्याने तिसऱ्या स्थानी फलंदाजांना संधी दिली जातेय. पहिल्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली. तर साई सुदर्शन याला दुसऱ्या कसोटीत तिसर्या स्थानी बॅटिंगसाठी पाठवण्यात आलं. मात्र साई दोन्ही डावात फ्लॉप ठरला.
भारताच्या फलंदाजांनी दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये घोर निराशा केली. भारतीय फलंदाज फिरकी विरुद्ध चांगली बॅटिंग करतात. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. तर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी फिरकी विरुद्ध अप्रतिम बॅटिंग केली.
शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत दुसऱ्या कसोटीत उपकर्णधार ऋषभ पंत याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. शुबमनला मानेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकावं लागलं. त्यामुळे पंतला नेतृत्वाची धुरा मिळाली. पंतला टी 20I क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे. मात्र पंतची कसोटीत नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र पंत या सामन्यात कर्णधार म्हणून अपयशी ठरला. तसेच पंत टीम इंडियाला गरज असताना अतरंगी फटका मारुन बेजबाबदरापणे आऊट झाला.
ऋषभ पंत याच्याकडे नेतृत्वासह विकेटकीपिंगची दुहेरी जबाबदारी होती. मात्र त्यानंतरही प्लेइंग ईलेव्हनमध्ये ध्रुव जुरेल याला संधी देण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता. जुरेलने फिल्डिंग केली. मात्र जुरेलला बॅटिंगने काही खास करता आलं नाही. जुरेलला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. तर जुरेल दुसऱ्या डावात 2 धावा करुन आऊट झाला. हेड कोच गौतम गंभीर याने घेतलेले हे निर्णय क्रिकेट चाहत्यांच्या समजण्यापलीकडचं ठरले.