
टीम इंडिया विशाखापट्टणममध्ये मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे विशाखापट्टणमध्ये मालिका विजेता निश्चित होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने रायपूरमध्ये दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत पहिल्या पराभवाची परतफेड केली होती. त्यामुळे आता टीम इंडिया विशाखापट्टणममध्ये सामन्यासह मालिका आपल्या नावावर करणार का? याकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
भारताला आधीच मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमवावी लागली आहे. त्यात विशाखापट्टणममध्ये पराभव झाल्यास वनडे सीरिजमध्येही पराभवाचा सामना करावा लागेल. अशात विशाखापट्टणममधील सामना प्रतिष्ठेचा असताना टीम इंडियाचे फक्त 4 खेळाडूच हेड कोच गौतम गंभीर याच्यासह सरावाला आल्याचं समोर आलं आहे. या 4 खेळाडूंसह हेड कोच व्यतिरिक्त सपोर्ट स्टाफमधील सदस्यही होते. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीने सरावाऐवजी विश्रांती करण्यास प्राधान्य दिलं.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाने सराव सत्राचं आयोजन केलंल नव्हतं. मात्र खेळाडूंना त्यांच्या मर्जीनुसार सराव करण्याची मुभा होती. त्यामुळे फक्त 4 खेळाडूंनीच या ऐच्छिक सरावाला हजेरी लावली. या चौघांमध्ये यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, वॉशिंगटन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश होता.
टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जैस्वाल याला रांची आणि रायपूरमध्ये झालेल्या पहिल्या 2 सामन्यांत ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र यशस्वी त्यानंतर आऊट झाला. त्यामुळे यशस्वीला भविष्यात एकदिवसीय संघात आपलं स्थान कायम राखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत त्याला अंतिम सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे.
ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. सुंदरला मधल्या फळीत बॅटिंगसाठी पाठवलं जात आहे. तसेच सुंदरला पहिल्या 2 सामन्यात हवी तशी बॉलिंगची संधी मिळाली नाही. त्याचा परिणाम हा सुंदरच्या आकडेवारीवर होताना दिसत आहे. तसेच नितीश कुमार रेड्डी आणि तिलक वर्मा या दोघांना आतापर्यंत या मालिकेत संधी मिळालेली नाही. त्यामुळे टीम मॅनेजमेंट या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.