कर्णधार गिल दुसऱ्या डावातही फेल! जमत नाही तो फटका मारला आणि बाद झाला, रहाणे-पुजाराने काढले वाभाडे
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्याचा दुसरा डाव सुरू आहे. या डावातही कर्णधार शुबमन गिलची बॅट काही चालली नाही. त्याने एक फटका मारला आणि बाद होत तंबूत परतला. त्यामुळे त्याच्या या शॉट सिलेक्शनवर रहाणे पुजाराने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Shubman Gill Wicket: भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याच्याकडून क्रीडाप्रेमींना फार अपेक्षा आहेत. मात्र पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात त्याने निराशा केली. पहिल्या डावात 28 चेंडूंचा सामना केला आणि 16 धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या डावात 20 चेंडूत 8 धावांवर तंबूत परतला. दोन्ही डावात फेल गेल्याने क्रीडाप्रेमींचा भ्रमनिरास झाला आहे. कारण एकीकडे शुबमन गिल खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील आहे दिसत होतं. पण त्याचवेळी एक असा फटका मारला की त्याची बाद होण्याची इच्छा असावी. गिलने निवडलेला फटका पाहून रहाणे आणि पुजाराही हैराण झाले आहेत. पुजाराने तर गिलची अक्कलच काढली. जो फटका मारता येत नाही तो मारायचा तरी का? असा प्रश्नच पुजाराने उपस्थित केला. गिलने नेमका कोणता फटका मारला आणि पुजारा-रहाणेसह क्रीडाप्रेमी नाराज झाले ते समजून घेऊयात..
गिल स्विप शॉट मारताना बाद
शुबमन गिल स्विप शॉट मारण्यात तितका पटाईत नाही. हे वारंवार दिसून आलं आहे. पण त्याने हा प्रयोग पुन्हा एकदा करून पाहिला आणि फेल झाला. प्रभात जयसूर्याच्या सरळ चेंडूवर त्याने स्विप मारण्याचा प्रयत्न केला. पण पूर्णपणे फसला आणि पायावर आदळला. त्यामुळे पायचीत होत तंबूत परतला. स्विप शॉट मारण्याचा पहिला नियम म्हणजे सरळ येणारा चेंडूवर शक्यतो असा फटका मारू नये. जर तुम्ही त्यात तरबेज असाल तरच असा फटका मारावा, नाही तर प्रयत्नही करू नये. माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी हीच बाब सांगितली.
रहाणे पुजारा काय म्हणाले?
चेतेश्वर पुजारा म्हणाला की, ‘जिथपर्यंत तुम्ही हा फटका मारण्यात मास्टर होत नाही तोपर्यंत असे शॉट खेळू नयेत. जर तुम्ही हा शॉट खेळण्यात योग्य नाहीत, तर नका खेळू. पहिल्यांदा स्विप खेळणं शिकायला हवं. गिलने समोर फटके मारण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण त्याचा डिफेंस खूप चांगला आहे.’ अजिंक्य राहणेने देखील पुजाराचं म्हणणं योग्य असल्याचं म्हंटलं. रहाणे म्हणाला की, ‘स्विप शॉटसाठी तुम्हाला खूप सराव करण्याची गरज आहे. यासाठी योग्य तंत्र असणं आवश्यक आहे. सध्याच्या संघात सरफराज खान आणि देवदत्त पडिक्कल यात तरबेज आहेत. गिल स्विप मारण्यात इतका चांगला नाही. त्याचा डिफेंस चांगला असून बॅकफूटवर चांगला खेळतो. गिल हा फटका मारण्यात जिथपर्यंत पारंगत होत नाही तोपर्यंत त्याने असं खेळणं टाळावं.’