न्यूझीलंडला भिडण्याचा प्लान, गुजरातचा धुरंधर बनणार भारताचा कॅप्टन, मुंबईच्या मुलांना मिळणार संधी
भारत 'अ' संघ न्यूझीलंड 'अ' (India A vs Newzeland A) विरुद्ध मालिका खेळेल. भारतीय क्रिकेट संघाच नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न आहे. या संदर्भात वेगवेगळे दावे सुरु आहेत.

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाची बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा इंडिया ‘ए’ (India A) चा संघ मैदानात उतरणार आहे. सद्य स्थितीत टीम इंडियाला चांगले पर्याय मिळावेत तसेच भविष्याचा पाया मजबूत करण्यासाठी इंडिया ‘ए’ लवकरच एक महत्त्वपूर्ण सीरीज खेळणार आहे. भारत ‘अ’ संघ न्यूझीलंड ‘अ’ (India A vs Newzeland A) विरुद्ध मालिका खेळेल. भारतीय क्रिकेट संघाच नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न आहे. या संदर्भात वेगवेगळे दावे सुरु आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांक पांचाळच (Priyank panchal) नाव जवळपास निश्चित झालं आहे.
न्यूजीलंड विरुद्ध टेस्ट आणि वनडे सीरीज
देशातंर्गत क्रिकेट मध्ये दिग्गज खेळाडूंमध्ये प्रियांक पांचाळचा समावेश होतो. न्यूझीलंड विरुद्ध तीन अनधिकृत कसोटी सामने (चार दिवस) आणि तीन वनडे (लिस्ट ए) सामन्यांसाठी संघाच नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या सीरीज साठी भारतीय संघाची निवड सोमवारी 22 ऑगस्टला होईल. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सीनियर सिलेक्शन कमिटी संघ निवडणार आहे.
कॅप्टनशिपसाठी कोण-कोण दावेदार?
इंडिया ए ने याआधी मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्या दौऱ्यातील बहुतांश खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी प्राधान्य देण्यात येईल. दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या मालिकेत प्रियांक पांचाळकडे संघाचं नेतृत्व होतं. प्रियांका पांचाळ गुजरातकडून खेळतो. “सध्या तो चेन्नईतच कॅमप्लास्टसाठी काही मैत्री सामने खेळतोय. त्याला सरावाची गरज आहे” असं गुजरात क्रिकेट संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. संघाच नेतृत्व करण्यासाठी फक्त प्रियांक पांचाळ एकटाच दावेदार नाहीय. भारतीय कसोटी संघात स्थान मिळवणाऱ्या हनुमा विहारी सुद्धा कॅप्टनशिपसाठी एक प्रबळ दावेदार आहे. त्याशिवाय शुभमन गिलच नावही चर्चेत आहे.
मयंक अग्रवाल, सर्फराज खानला संधी
टीम इंडियाचा बॅकअप ओपनर मयंक अग्रवालसह अभिमन्यु ईश्वरन, बाबा अपराजित, उपेंद्र यादव, सौरभ कुमार आणि केएस भरत यांची कसोटी संघात निवड होऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट रुळावर आणण्यासाठी मयंक अग्रवालसाठी ही एक संधी असू शकते. टेस्ट संघाचा भाग बनलेल्या प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीन सैनी भारत अ संघात निवडलं जाईल. शिवम मावी आणि कमलेश नागरकोटीला संधी मिळू शकते. जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची सुद्धा चाचपणी केली जाऊ शकते.
मुंबईच्या खेळाडूला मिळेल संधी
रणजी करंडक स्पर्धेत धावांच्या राशी उभारणारा मुंबईचा युवा फलंदाज सर्फराज खानला (982 धावा) सर्वच्या सर्व तीन कसोटी सामन्यांसाठी निवडलं जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशचा रजत पाटीदारची निवड निश्चित मानली जातेय. आयपीएल आणि रणजी मध्ये त्याने 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मुंबईच्या शम्स मुलानीवरही विश्वास दाखवला जाईल. त्याने 45 विकेट घेताना 321 धावा केल्या आहेत.
