India Vs Pakistan : आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदाच भारत पाकिस्तान सामना असा होणार, कारण की…
आशिया कप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान या संघात होणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारताचं पारडं जड दिसून आलं आहे. आता होणाऱ्या सामन्यातही भारतीय संघ बाजी मारेल अशी अपेक्षा आहे. असं असताना आशिया कप स्पर्धेच्या इतिहास एक बाब पहिल्यांदाच घडण्याची शक्यता आहे.

आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी विजयाने सुरुवात केली आहे. भारताने युएईला तर पाकिस्तानने ओमानला नमवलं आहे. त्यामुळे आपल्या गटात टॉपला राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयार केली आहे. मात्र यंदाच्या आशिया कप स्पर्धेत एक वेगळंच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यंदाचं आशिया कप स्पर्धेचं 17वं पर्व आहे. आतापर्यंत भारताने सर्वाधिक आठवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर तीन वेळा उपविजेत्या पदावर समाधान मानावं लागलं आहे. तर पाकिस्तानने फक्त दोनवेळा जेतेपदाची चव चाखली आहे. तर तीन वेळा पराभव सहन करावा लागला आहे. दोन्ही संघांनी एकदा या स्पर्धेवर पाणी सोडलं आहे. पण या स्पर्धेच्या इतिहासात क्रीडाप्रेमींच्या नशिबात कधीच दोन्ही संघात अंतिम सामना पाहण्याची वेळ आली नाही. त्यामुळे यंदा तसं होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागच्या दहा वर्षात भारताचं या स्पर्धेत पारडं जड दिसून आलं आहे. दोन्ही संघ सातवेळा आमनेसामने आले. यापैकी फक्त एका सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात भारताचं वर्चस्व राहिलं आहे. एका सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली होती. दुसरीकडे आशिया कप टी20 फॉर्मेटमध्ये भारत पाकिस्तान हे संघ तीन वेळा आमनेसामने आले. यात भारताने दोन, तर पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले तर आशिया कप इतिहासातील पहिलीच वेळ असेल. इतकंच काय तर या सामन्यात भारत पाकिस्तान यांच्यात तीन सामने होण्याची शक्यता आहे.
आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात 18 सामने झाले आहेत. यात भारताने 10, तर पाकिस्ताने 6 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. टी20 आशिया कप स्पर्धेतील टी20 फॉर्मेटमध्ये दोन्ही संघ 2016 मध्ये पहिल्यांदा भिडले होते. तेव्हा भारताने हा सामना 5 विकेट राखून जिंकला होता. तर 2022 मध्ये दुबईत झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानी दोन सामने खेळले होते. तेव्हा भारताने पहिला, तर पाकिस्तानने दुसरा सामना जिंकला होता. मागच्या दहा वर्षात पाकिस्तानचा हा एकमेव विजय राहिला आहे.
