Asia Cup 2025: यशस्वी स्टँडबाय, श्रेयस आऊट; बुमराह खेळणार! जाणून घ्या संघ निवडीतील 5 गोष्टी
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर शुबमन गिलचं कमबॅक झालं असून उपकर्णधार असेल. चला जाणून आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघाबाबत...

आशिया कप स्पर्धेसाठी बहुप्रतिक्षीत भारतीय संघाची अखेर निवड करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव आणि अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत खेळाडूंच्या नावाची घोषणा केली. 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करताना काही नाव आश्चर्यचकीत करणारी होती. तर काही नावं अपेक्षित होती. शुबमन गिलचं टी20 संघात कमबॅक झालं आहे. इतकंच काय तर त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शुबमन गिल श्रीलंका टी20 मालिकेत उपकर्णधार होता. दुसरीकडे, या संघात जसप्रीत बुमराहचं कमबॅक झालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे खेळला नसल्याचं सांगण्यात येत होतं. दुसरीकडे, त्याला दुखापत झाल्याची चर्चा होती. पण आता त्याची संघात निवड झाल्याने क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. 15 खेळाडूंची निवड करताना या संघातील 5 महत्वाच्या गोष्टी समजून घेऊयात.
- टीम इंडियाच्या टी20 संघात यशस्वी जयस्वालची निवड केलेली नाही. त्याला स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवलं आहे. पण त्याची निवड झाली नाही हे मात्र तितकंच खरं आहे. दुसरीकडे शुबमन गिलची संघात निवड झाली असून त्याच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. 2026 वर्ल्डकपनंतर त्याच्याकडे संघाची धुरा सोपवली जाऊ शकते. तर अक्षर पटेलचं उपकर्णधारपद काढून घेतलं आहे.
- यष्टीरक्षक जितेश शर्माचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली होती. त्याची संघात मॅच फिनिशर म्हणून भूमिका असू शकते. त्यामुळे संजू सॅमसन आणि त्याच्यात प्लेइंग 11 साठी रस्सीखेच असेल.
- रिंकु सिंगला संघात स्थान देण्यात आलं आहे. डावखुरा फलंदाज असल्याने त्याची गरज संघाला आहे. या फॉर्मेटमध्ये तो चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार झाला आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे.
🚨 #TeamIndia‘s squad for the #AsiaCup 2025 🔽
Surya Kumar Yadav (C), Shubman Gill (VC), Abhishek Sharma, Tilak Varma, Hardik Pandya, Shivam Dube, Axar Patel, Jitesh Sharma (WK), Jasprit Bumrah, Arshdeep Singh, Varun Chakaravarthy, Kuldeep Yadav, Sanju Samson (WK), Harshit Rana,…
— BCCI (@BCCI) August 19, 2025
- कुलदीप यादवला स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून संधी दिली आहे. या संघात रवि बिश्नोईला स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे अक्षर पटेलसोबत कुलदीप यादव फिरकी गोलंदाजी करताना दिसू शकतो.
- ध्रुव जुरेल, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि रियान पराग यांना स्टँडबाय ठेवलं आहे. जर संघातील एखाद्या खेळाडूला दुखापत झाली. या पाच खेळाडूंपैकी एकाला संधी मिळू शकते. पण तसं झालं नाही तर त्यांना फक्त वाट पाहावी लागेल. टी20 वर्ल्डकप संघात जागा मिळणंही या खेळाडूंना कठीण होईल.
