T20 World Cup 2007 मध्ये बॉल आऊट करत भारताने पाकिस्तानवर मिळवला विजय, पण गौतम गंभीरने स्पष्टच सांगितलं..
India Vs Pakistan : टी20 वर्ल्डकप 2007 मध्ये भारताने ग्रुप स्टेज फेरीत पाकिस्तानला बॉल आऊटच्या माध्यमातून पराभूत केलं होतं. पण बॉल आऊट नियमाबाबत गौतम गंभीर याने आपलं स्पष्ट मत जाहीर केलं आहे.

मुंबई : माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा त्याच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतो. खासकरून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याबाबत बोलण्यात मागेपुढे पाहात नाही. आता गौतम गंभीर याने 2007 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपमधील विजयाबाबत रोखठोक मत व्यक्त केलं आहे. टी20 क्रिकेट कारकिर्दीतील पहिला वर्ल्डकप 2007 साली खेळला गेला होता. 14 सप्टेंबर 2007 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेजमधील सामना झाला होता. या सामन्यात भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 141 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने यात 50 धावांचं योगदान दिलं होतं. पाकिस्ताने 20 षटकात 7 गडी गमवून 141 धावा केल्या. यात मिस्बाह उल हक याने 53 धावांची खेळी केली. त्यामुळे ड्रा झालेल्या सामन्याचा निकाल बॉल आउटमध्ये गेला आणि भारताने पाकिस्तान विजय मिळवला.
14 सप्टेंबर या दिवसाचं औचित्य साधत बॉल आउटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताच्या पार्ट टाईम गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक स्टम्प उडवले आणि विजय मिळला. महेंद्रसिंह धोनी याने सर्वात आधी वीरेंद्र सेहवाग याला बॉल सोपवला आणि त्याने स्टम्प उडवून दाखवल्या. त्यानंतर यासिर अराफातला बॉल टाकण्याची संधी मिळाली आणि त्याच्याकडून हवं तसं झालंच नाही.
दुसरा चेंडू हरभजन सिंग याच्याकडे सोपवला त्यानेही त्रिफळा उडवला. पण उमर गुल याने अराफातसारखीच चूक पुन्हा केली. तिसऱ्यांदा रॉबिन उथप्पा आला आणि त्याने भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाकिस्तानकडून आलेल्या शाहिद आफ्रिदीलाही स्टम्प उडवता आले नाहीत आणि पाकिस्तानचा 3-0 ने पराभव झाला.
काय म्हणाला गौतम गंभीर?
गौतम गंभीर याने या विजयाबाबत आता रोखठोक मत मांडलं आहे. “बॉल आउट हा सर्वात खराब नियम होता. हा नियम कोणी बनवला हे मला माहिती नाही. पण सामन्याचा निकाल अशा पद्धतीने लावणं चुकीचं होतं. सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागायला हवा होता. पण त्यावेळी तसा नियम नव्हता. कारण एखाद्या बॉलर्सला स्टम्प उडवायला सांगणं हे सोपं नसतं. तेव्हा जे काही झालं त्याबाबत असंच म्हणावं लागेल की, नशिबाने आम्हाला साथ दिली.”, असं गौतम गंभीर एका टीव्हीवरील कार्यक्रमात बोलला.
काय म्हणाला पियुष चावला?
बॉल आउटसाठी काय सराव केला होताय़ असा प्रश्न पियुष चावला याला विचारला. त्यावर पियुष चावला याने उत्तर दिलं की, “वेंकटेश प्रसाद आमचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी हा नियम असल्याचं सांगून आमच्याकडून बॉल आउटचा सराव करून घेतला होता. असंच कोणीतरी आलं आणि बॉल टाकले असं नाही. आम्ही त्यासाठी तयार होतो.”
