U19 WC 2026: भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच, झिम्बाब्वेला 204 धावांनी केलं पराभूत

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीत भारताने झिम्बाब्वेचा 204 धावांनी धुव्वा उडवला. यासह भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने कूच केली आहे. पण या वाटेत पाकिस्तानला पराभूत करावं लागणार आहे.

U19 WC 2026: भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच, झिम्बाब्वेला 204 धावांनी केलं पराभूत
भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच, झिम्बाब्वेला 204 धावांनी केलं पराभूत
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jan 27, 2026 | 8:42 PM

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीत भारत आणि झिम्बाब्वे हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करून सोडलं. भारताने या सामन्यात 50 षटकांचा खेळ खेळला आणि 8 गडी गमवून 352 धावा केल्या. तसेच विजयासाठी 353 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं काही झिम्बाब्वेला जमलं नाही आणि संपूर्ण संघ अवघ्या 148 धावांवर बाद झाला. हा सामना भारताने 204 धावांनी जिंकला. या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीतील दावा पक्का झाला आहे. कारण भारताच्या खात्यात फक्त दोन गुणच नाही तर मोठ्या फरकाने जिंकल्याने नेट रनरेटही सुधारला आहे. आता पाकिस्तानचं गणित यामुळे बिघडलं आहे.

भारताकडून एरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानात उतरली होती. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 44 धावांची भागीदारी केली. एरॉन जॉर्ज 23 धावा करून बाद झाला. त्यानंतर आयुष म्हात्रे आला आणि 21 धावांची खेळी करून तंबूत परतला. वैभव सूर्यवंशीचा झंझावात सुरू झाला. त्याने 30 चेंडूत 52 धावांची खेळी केली. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. वेदांत त्रिवेदी 18 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. भारताने 130 धावांवर 4 गडी गमावले होते. पण मधल्या फळीत विहान मल्होत्रा आणि अभिज्ञान कुंडू यांनी जबरदस्त खेळी केली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. अभिज्ञान कुंडू 62 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. तर विहान मल्होत्राने शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 107 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 107 धावा केल्या.

भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात काही चांगली झाली नाही. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. लीरॉय चिवौला याने 62 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. भारताकडून कर्णधार आयुष म्हात्रेने 4 षटकात 14 धावा देत 3 गडी बाद केले. तर उद्धव मोहनने 6.4 षटकात 20 धावा देत 3 गडी बाद केले. आरएस अंब्रिशनने 2 विकेट, तर हेनिल पटेल आणि खिलान पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.