Champions Trophy : भारतासाठी ‘करो’ तर पाकिस्तानसाठी ‘मरो’चा सामना, असं आहे उपांत्य फेरीचं गणित
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारीला होत आहे. पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. तर भारताने हा सामना जिंकला तर थेट उपांत्य फेरीत स्थान मिळणार आहे. कसं काय आहे गणित ते समजून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडला. हा सामना न्यूझीलंडने 60 धावांनी जिंकल्याने नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानसमोबर 320 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पाकिस्तानचा संघ फक्त 260 धावा करू शकला. न्यूझीलंडने या विजयासह 2 गुण आणि नेट रनरेट हा +1.200 इतका आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत चौथ्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात पार पडला. या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे दोन गुणांसह नेट रनरेट +0.408 इतका असून दुसऱ्या स्थानावर आहे. या गटातील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. 23 फेब्रुवारीला दुबईच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात पाकिस्तान पराभूत झाला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. तसेच भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे.
भारताने पाकिस्तान विरुद्धचा सामना गमवला तर भारताला उपांत्य फेरीसाठी तिसऱ्या सामन्यावर अवलंबून राहावं लागेल. भारताचा तिसरा सामना 2 मार्चला न्यूझीलंडविरुद्ध आहे. हा सामना जिंकून भारताला काहीही करून नेट रनरेटही सांभाळावा लागणार आहे. अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यापर्यंत गणित घेऊन जाणं अंगलट येऊ शकतं. अशा स्थितीत भारताला पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकणं भाग आहे. भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात 3 सामन्यात पाकिस्तान, तर दोन सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. मागच्या पर्वात अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी धुव्वा उडवला होता.
दोन्ही संघाचे खेळाडू
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
