
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत साखळी फेरीत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना 15 फेब्रुवारीला ठरल्याप्रमाणे आहे. मात्र या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. यानंतर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला थेट इशारा दिला आहे. जर का पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. असं असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफचं विधान समोर आलं आहे. त्याने सांगितलं की, पाकिस्तान भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय मागे घेऊ शकते. राशिद लतीफने भारतीय प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की, पाकिस्तानला निर्णय बदलण्याची सवय आहे. राशिद लतीफने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, पाकिस्तान आपला निर्णय मागे घेऊ शकते.
पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या बहाण्याने राजकीय पोळी भाजत आहे. मोहसिन नकवीच्या निर्णयाची पाकिस्तानात स्तुती होत आहे. राशिद लतीफने सांगितलं की, ‘पाकिस्तान आपला निर्णय मागे घेऊ शकते. आमच्या येथे तसंच होतं. यात काही अडचण नाही. आशा आहे की पडद्यामागून काही चर्चा होत असण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान सरकार कदाचित एकमेकांशी बोलत असावेत. असं आम्हाला दिसत नाही पण तसंच होतं. पुढच्या 24 तासात काहीही होऊ शकते.’ राशिद लतिफच्या वक्तव्यानंतर पु्न्हा एकदा पाकिस्तानचं पितळ उघडं पडणार असं दिसत आहे. पाकिस्तान जाणीवपूर्वक अशी स्थिती तयार करत असल्याचं बोललं जात आहे.
पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना खेळला नाही तर त्यांचं प्रचंड नुकसान होऊ शकते. स्पर्धेतील दोन गुण असेच जातील. त्याचबरोबर कोट्यवधींचं नुकसान होईल ते वेगळं.. पाकिस्तानला आयसीसी स्पर्धांमधून पैसे मिळतात. त्यामुळे बहिष्कार टाकला तर आयसीसीकडून मिळणारी वार्षिक रक्कमही मिळणार नाही. इतकंच काय तर द्विपक्षीय मालिकेतून सस्पेंड केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानची पूर्ण वाताहत होईल. 2028 मध्ये टी20 वर्ल्डकपचं यजमानपदही मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच जगभरातील क्रिकेट बोर्ड पीएसएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना एनओसी देखील देणार नाहीत.