IPL 2025 Suspended : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL स्थगित, उर्वरित सामने केव्हा होणार? Bcci कडून मोठी अपडेट

IPL 2025 SUSPENDED : आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांचं आयोजन केव्हा होणार? सुधारित वेळापत्रक केव्हा जाहीर केलं जाणार? याबाबत बीसीसीआयच्या राजीव शुक्ला यांनी काय माहिती दिली जाणून घ्या.

IPL 2025 Suspended : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL स्थगित, उर्वरित सामने केव्हा होणार? Bcci कडून मोठी अपडेट
ipl trophy
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 09, 2025 | 3:41 PM

भारत-पाकिस्तान यांच्यात गेल्या 2 दिवसांपासून एकमेकांवर ड्रोन हल्ले सुरु आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील या वाढत्या तणावाचा परिणाम क्रिकेट स्पर्धांवरही झाला आहे. दोन्ही देशातील आयपीएल (IPL 2025) आणि पीएसएल (PSL 2025) स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित सामने हे आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित सामने केव्हा होणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आता या उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आयपीएलचा 18 वा मोसम सुरक्षिततचेच्या कारणामुळे स्थगित करण्यात आला आहे. या मोसमातील 57 सामने यशस्वीरित्या खेळण्यात आले. मात्र 8 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना (58 वा सामना) हा फलड्स लाईट्समुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर आता उर्वरित सामने आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती आयपीएलकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 16 सामने होणं बाकी आहेत. हे सामने केव्हा होणार? याबाबतची अपडेट जाणून घेऊयात.

बीसीसीआय उपाध्यक्ष काय म्हणाले?

“आयपीएलचा 18 वा मोसम एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यानंतर सद्य परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर संबंधित यंत्रणांसह चर्चा केली जाईल. त्यानंतर स्पॉन्सर, फ्रँचायजी आणि ब्रॉडकास्टर्ससह चर्चा करुन उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल”, अशी माहिती बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.

आयपीएल 2025 आठवड्यासाठी स्थगित

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

आयपीएलचा 18 वा हंगाम अखेरच्या टप्प्यात असल्याने प्लेऑफसाठी चुरस पाहायला मिळत होती. चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद या 3 संघांचं आव्हान संपुष्ठात आलं. त्यामुळे प्लेऑफच्या 4 जागांसाठी 7 संघांमध्ये चुरस आहे. ताज्या आकडेवारीनुसार,गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 16 गुण आहेत.

पंजाब किंग्स 15 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स चौथ्या (14 पॉइंट्स) आणि दिल्ली कॅपिट्ल्स (13 पॉइंट्स) पाचव्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातही प्लेऑफसाठी चढाओढ पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे उर्वरित सामन्याचं सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा थरार अनुभवता येणार आहे.