
टीम इंडियाने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोघांनी केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडवर दुसऱ्या टी 20I सामन्यात जबरदस्त विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडकडून विजयासाठी मिळालेलं 209 धावांचं आव्हान हे 3 विकेट्सच्या मोबदल्यात 15.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताने अशाप्रकारे या मालिकेत आणि रायपूरमधील वीर शहीद नारायण सिंह स्टेडियममध्ये एकूण आणि सलग दुसरा टी 20I सामना जिंकला. भारताने आता या विजयासह मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे. तसेच भारताने या विजयासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. भारताने न्यूझीलंडला पराभूत करण्यासह पाकिस्तानला झटका दिला आणि ऐतिहासिक कामगिरी केली.
भारत टी 20I क्रिकेटमध्ये 200 पेक्षा अधिक धावांचा वेगवान यशस्वी पाठलाग करणारा पहिला संघ ठरला. याआधी हा वर्ल्ड रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्तानने 2025 मध्ये 205 धावांचं आव्हान हे 24 बॉलआधी पूर्ण केलं होतं. तर भारताने 28 बॉलआधी 209 धावांचं आव्हान पूर्ण केलं.
भारताला रायपूरमध्ये विजयी करण्यात इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर शिवम दुबे यानेही सूर्याला चांगली साथ दिली. सूर्या-इशानने तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. शिवम बाद झाल्यानंतर सूर्याने शिवमसोबत फटकेबाजी सुरु ठेवत भारताला विजयापर्यंत पोहचवलं. सूर्या-शिवमने नाबाद 81 धावांची भागीदारी केली. सूर्याने सर्वाधिक आणि नाबाद अशा एकूण 82 धावा केल्या. शिवम 36 रन्सवर नॉट आऊट परतला. तर इशानने 76 रन्सचं योगदान दिलं.
भारताने या विजयासह पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिकेलाही दणका दिला आहे. भारत टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा दुसरा संघ ठरला. भारताची अशी कामगिरी करण्याची ही सहावी वेळ ठरली. भारताने यासह दक्षिण आफ्रिकेला मागे टाकलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची या यादीत तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने टी 20i क्रिकेटच्या इतिहासात एकूण 5 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. तर हा वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक 7 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.