IND vs NZ : सूर्या-इशानचा अर्धशतकी तडाखा, भारताचा सलग दुसरा विजय, न्यूझीलंडचा 7 विकेट्सने धुव्वा
India vs New Zealand 2nd T20i Match Result : टीम इंडियाने नागपूरनंतर रायपूरमध्येही न्यूझीलंडवर एकतर्फी आणि धमाकेदार विजय साकारला आहे. भारताचा हा या मैदानातील दुसरा टी 20i विजय ठरला.

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. भारताने नागपूरनंतर रायपूरमध्येही न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आहे. भारताने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडला 7 विकेट्सने लोळवत सलग दुसरा विजय साकारला आहे. न्यूझीलंडने भारतासमोर 209 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताची या विजयी धावांचा पाठलाग करताना सलामी जोडी अपयशी ठरली. संजू सॅमसन 6 धावांवर बाद झाला. तर अभिषेक शर्मा याला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र त्यानंतरही भारताने हा सामना 16 व्या ओव्हरमध्येच जिंकला. कॅप्टन सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि शिवम दुबे या तिघांनी बॅटिंगने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
टीम इंडियाने 209 धावांचं आव्हान हे 28 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 15.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात हे विजयी आव्हान गाठलं. भारताचा रायपूरच्या मैदानातील हा सलग आणि एकूण दुसरा टी 20 विजय ठरला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली.
सामन्याचा धावता आढावा
भारताने न्यूझीलंडला टॉस जिंकून बॅटिंगसाठी बोलावलं. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. रचीन रवींद्र याने 44 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन मिचेल सँटरन याने नाबाद 47 धावा केल्या. तर इतर पाचही फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठत न्यूझीलंडला 208 धावांपर्यंत पोहचवण्यात योगदान दिलं. भारतासाठी कुलदीप यादव याने 2 विकेट्स मिळवल्या.
टीम इंडियाची ओपनिंग जोडी फ्लॉप
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने निराशा केली. संजूला जीवनदान मिळाल्यानंतरही त्याला 6 धावाच करता आल्या. त्यानंतर अभिषेक शर्मा झिरोवर आऊट झाला. त्यामुळे भारताची 1.1 ओव्हरमध्ये 2 आऊट 6 अशी स्थिती झाली.
इशान-सूर्याने धु धु धुतला
संजू-अभिषेक झटपट आऊट झाल्यानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव या जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना झोडून काढला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन भारताच्या विजयाचा पाया रचला. सूर्या आणि इशान या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 48 बॉलमध्ये 122 रन्सची पार्टनरशीप केली. इशान आऊट होताच ही भागीदारी मोडीत निघाली. इशानने 37 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 9 फोरसह 82 रन्सची विस्फोटक खेळी केली.
भारताचा दणदणीत विजय
As breathtaking as it can get 💥#TeamIndia sail over the finish line with 7⃣ wickets to spare in Raipur ⛵️
With that, they lead the series 2⃣-0⃣ 👏
Updates ▶️ https://t.co/8G8p1tq1RC#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UXOo96Qbup
— BCCI (@BCCI) January 23, 2026
शिवमसोबत विजयी भागीदारी
इशाननंतर मैदानात आलेल्या शिवम दुबे याने कॅप्टन सूर्याला कडक साथ दिली. शिवमने सूर्यासोबत चाबूक बॅटिंग केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 37 बॉलमध्ये 81 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. शिवमने 3 सिक्स आणि 1 फोरसह 18 बॉलमध्ये नॉट आऊट 36 रन्स केल्या. तर सूर्याने 37 चेंडूत 4 फोर आणि 9 सिक्ससोबत नाबाद 82 धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडसाठी तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
