Suryakumar Yadav : सूर्याला अखेर सूर गवसलाच, न्यूझीलंड विरुद्ध 23 चेंडूत वादळी अर्धशतक, रायपूरमध्ये कॅप्टनचा झंझावात
Suryakumar Yadav Fifty IND vs NZ 2nd T20i : कर्णधार सूर्यकुमार यादव याने 209 धावांचा पाठलाग करताना आणि टीम इंडिया अडचणीत असताना वादळी खेळी करत अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने अखेर चाहत्यांची अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपवत आपला तडाखा दाखवला आहे. सूर्याच्या बॅटने चाहते मोठ्या फटक्यांसह चाबूक खेळी पाहण्यासाठी आसुसले होते. मात्र सूर्या सातत्याने मोठी खेळी करम्यात अपयशी ठरत होता. मात्र सूर्याने रायपूरमध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात चाहत्यांना जल्लोष करण्याचं निमित्त दिलं. सूर्याने विजयी धावांचा पाठलाग करताना विस्फोटक अर्धशतक झळकावलं. सूर्याने यासह कमबॅक केलं. सूर्याने तब्बल 14 महिन्यांनंतर हे अर्धशतक लगावलं.
भारताची न्यूझीलंडने दिलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. संजू सॅमसन 6 धावा करुन माघारी परतला. तर नागपूरमधील विजयाचा हिरो अभिषेक शर्मा याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भारताची 2 बाद 6 अशी स्थिती झाली. त्यानंतर सूर्यकुमार आणि इशान या दोघांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी फटकेबाजी करुन भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.
सूर्यकुमार यादव-इशान किशन याची शतकी भागीदारी
सूर्या आणि इशान या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी फक्त 48 बॉलमध्ये 122 धावांची शतकी भागीदारी केली. टीम इंडियापासून दूर असलेल्या इशानने तब्बल 2 वर्षांनंतर टी 20i क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावलं. मात्र इशान त्यानंतर काही धावा जोडून आऊट झाला. इशानने 32 बॉलमध्ये 76 रन्स केल्या.
शिवम दुबेसोबत सूर्याची फटकेबाजी
सूर्याने शिवमसोबत फटकेबाजी सुरु ठेवली. सूर्याने जेकब डफी याने टाकलेल्या 11 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर 1 धाव घेतली. सूर्याने यासह अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने अवघ्या 23 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह हे अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याचं हे टी 20i कारकीर्दीतील हे 22 वं अर्धशतक ठरलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्याने तब्बल 14 महिने आणि 23 डावांनंतर हे पहिलंवहिलं अर्धशतक लगावलं.
सूर्याला गेल्या वर्षभरापासून धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सूर्याच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र सूर्याने निर्णायक क्षणी कमबॅक करत तो भारताचा प्रमुख फलंदाज का आहे? हे दाखवून दिलं.
