IND vs NZ : ..तर 8 मार्चला Final मॅच होणार नाही, आयसीसीचा नियम काय? जाणून घ्या

Icc T20i World Cup 2026 Final Reserve Day Rule : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्याची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. रविवारी 8 मार्चला हा सामना होणार आहे. मात्र सामन्याच्या तारखेत बदल होऊ शकतो. जाणून घ्या.

IND vs NZ : ..तर 8 मार्चला Final मॅच होणार नाही, आयसीसीचा नियम काय? जाणून घ्या
Suryakumar Yadav Indian Cricket Team Captain
Image Credit source: Bcci
| Updated on: Mar 07, 2026 | 5:41 PM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वाचा (Icc T20i World Cup 2026) विजेता कोण होणार? हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीतील संघ वर्ल्ड कप फायनल निमित्ताने पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी फायनलमध्ये यजमान टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे. हा सामना रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र नको तसं घडल्यास हा सामना 8 मार्चला होणार नाही. आयसीसीचा तसा नियमच आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

इंडिया आणि न्यूझीलंड टीमने टी 20i वर्ल्ड कप जिंकण्यासाठी जोरदार सराव केला आहे. टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. तर न्यूझीलंडचा पहिल्यांदाच वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे या महाअंतिम सामन्याच चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

तर सामन्याची तारीख बदलणार

महाअंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही कारणामुळे जर मुख्य दिवशी सामना न झाल्यास राखीव दिवशी फायनल मॅच खेळवण्यात येईल. या महाअंतिम सामन्यासाठी सोमवार 9 मार्च हा राखीव दिवस आहे. हवामान आणि इतर कोणत्याही कारणामुळे मुख्य दिवशी सामना न झाल्यास सोमवारी वर्ल्ड चॅम्पियन कोण असणार? हे निश्चित होईल.

आयसीसीच्या स्पर्धेत सेमी फायनल आणि फायनल मॅचसाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात येते. अनेकदा लहरी हवामानामुळे मुख्य दिवशी सामना होत नाही. तसेच अनेकदा खेळ झाला तरी तो संपूर्ण होत नाही. वेळ वाया गेल्याने खेळ कमी षटकांचा होतो. त्यामुळे या अशा सर्व शक्यता लक्षात घेऊन दोन्ही संघांवर अन्याय होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेऊन राखीव दिवसाची तरतूद करण्यात येते. जेणेकरुन मुख्य दिवशी सामना झाला नाही तरी राखीव दिवशी उर्वरित किंवा संपूर्ण मॅच खेळवता येईल.

राखीव दिवसाबाबत नियम काय?

साधारणपणे सामना मुख्य दिवशीच निकाली काढण्याचा सामनाधिकारी आणि संबंधितांचा प्रयत्न असतो. मात्र अगदीच तसं शक्य झालं नाही तरच राखीव दिवसापर्यंत सामना पोहचतो. महत्त्वाचं म्हणजे मुख्य दिवशी सामना जिथे थांबवण्यात आला तिथूनच राखीव दिवशी खेळाची सुरुवात केली जाते. राखीव दिवशी पुन्हा नव्याने सामन्याची सुरुवात केली जात नाही.

Follow Us