युझवेंद्र चहलचा मोठा निर्णय, क्रिकेटच्या एका फॉर्मेटमधून घेतली निवृत्ती, लिहिली भावूक पोस्ट…
Yuzvendra Chahal Retirement: युझवेंद्र चहलने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलने लाल चेंडूच्या क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. तो आता प्रथम-श्रेणी क्रिकेट खेळताना दिसणार नाही. त्याने नुकताच लॉर्ड्सवर नॉर्थम्प्टनशायरकडून आपला शेवटचा लाल चेंडूचा सामना खेळला. मात्र हा लेग-स्पिनर पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहे. तो बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. तो भारतासाठी शेवटचा ऑगस्ट २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहित याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने अधूरं राहिलेल्या त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितले आहे.
युझवेंद्र चहलने भारतासाठी ७२ एकदिवसीय आणि ८० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु त्याला एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. याचा अर्थ त्याने लाल चेंडूने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर करत चहलने लिहिले की, “मी हातात घेतलेला पहिला क्रिकेटचा चेंडू लाल रंगाचा होता. मी १० वर्षांचा होतो आणि तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी या खेळाच्या इतका प्रेमात पडेन.
View this post on Instagram
त्याने सांगितले की, माझ्यासाठी लाल चेंडूचे क्रिकेट कधीच केवळ एक प्रकार नव्हते. तिथेच मी संयम, चारित्र्य, कणखरपणा आणि प्रत्येक धाव व प्रत्येक विकेटसाठी लढत, तासनतास मैदानावर टिकून राहण्याचा खरा आनंद शिकलो. मी माझा शेवटचा प्रथम-श्रेणी सामना लॉर्ड्सवर खेळलो. हे शब्द उच्चारताना खूप भावूक होत आहे.
युझवेंद्र चहल पुढे म्हणाला की, कसोटी संघात स्थान मिळवणे हे माझे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. ते कदाचित पूर्ण झाले नसेल. पण मी माझ्या प्रवासावर खरोखरच आनंदी आहे आणि या फॉरमॅटमध्ये मिळालेल्या प्रत्येक संधीबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे. लाल चेंडूने मला माझ्या आयुष्यातील काही सर्वात सुंदर आठवणी दिल्या आहेत आणि त्या आठवणी कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही.
युझवेंद्र चहलने सांगितले की, एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाकडून खेळण्याचे त्याचे स्वप्न अजूनही जिवंत आहे. माझ्या मनात अजूनही टीम इंडियाकडून खेळण्याची भूक आहे. मला वाटते की माझ्यात अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे. एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन.
