कुणाचे वडील भाजी विक्रेते, तर कुणाचे शेतकरी, भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या लेकींचे वडील काय करतात?
भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच विश्वचषक जिंकून इतिहास घडवला. हा विजय केवळ संघाचा नसून, प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, वडिलांच्या अथक परिश्रमाच्या आणि प्रोत्साहनाच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या प्रत्येक खेळाडूचा आहे.

भारतीय महिला संघाने प्रथमच महिला एकदिवसीय विश्वचषकांचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी मात करत विजेतेपदावर नाव कोरले. भारताने दिलेल्या २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांत आटोपला आणि भारताने पहिल्यांदाच विश्वचॅम्पियन होण्याचा गौरव मिळवला.
ज्या लेकींनी भारताला हा वर्ल्ड कप जिंकून दिला, त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. यातील प्रत्येक महिला खेळाडूने परिस्थितीशी झगडत, संकटाशी दोन हात करत भारतीय टीमपर्यंतचा आपला प्रवास पूर्ण केला आहे. या विश्वविजेत्या खेळाडूंचे वडील काय काम करत होते. त्यांच्या मेहनत, त्याग व परिश्रमाच्या जोरावर आज भारत विश्वचॅम्पियन कसा बनला, याबद्दल आपण जाणून घेणार आहेत.
क्लार्कची लेक बनली वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन!
भारतीय महिला संघाला पहिल्यांदाच विश्वचॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधार हरमनप्रीत कौर यांचे वडील हरमिंदर सिंह भुल्लर हे कोर्टात क्लार्क होते. हरमनप्रीतच्या वडिलांना स्वतःला क्रिकेटर बनायचे होते. पण नोकरी आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. मात्र, त्यांनी आपल्या मुलीला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज त्यांच्या लेकीने भारताला विश्वचषक जिंकून दिला.
सुताराची लेक मैदानात उतरली!
भारताला विश्वचॅम्पियन बनवण्यात अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौर हिचीही महत्त्वाची भूमिका आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वुलवार्टचा कॅच घेतला आणि तिथेच सामना पलटला. अमनजोतचे वडील सुतार (कारपेंटर) आहेत. त्यांनी सुरुवातीपासून आपल्या मुलीला क्रिकेटसाठी पाठिंबा दिला. जेव्हा अमनजोतला मोहालीच्या गल्ल्यांमध्ये मुलांनी खेळण्यापासून रोखले, तेव्हा तिचे वडील भूपिंदर सिंग यांनी तिच्यासाठी खास बॅट बनवली. एवढेच नव्हे तर, ती १५ वर्षांची होईपर्यंत ते तिला स्कूटरवरून मोहाली ते चंदीगड क्रिकेट अकादमीपर्यंत घेऊन जायचे. १८ वर्षांची झाल्यावर त्यांनी तिला स्कूटी भेट दिली. जेणेकरून ती स्वतः ट्रेनिंगला जाऊ शकेल.
दूध आणि भाजी विकणाऱ्याची लेक
महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मुंबईत दूध आणि भाजीपाला विकणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीलाही खेळण्याची संधी मिळाली. ओमप्रकाश यादव हे मुंबईतील कांदिवली वेस्टमध्ये भाजीचा ठेला लावतात. अनेक समस्या असूनही त्यांनी आपली लेक राधा यादव हिचे स्वप्न पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. राधाला लहानपणी मुलांसोबत खेळायला आवडायचे. पण बॅट नसल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला लाकडाची बॅट बनवून दिली होती आणि आज त्यांची लेक यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.
भारतीय महिला संघातील क्रिकेटपटू उमा छेत्री हिचे वडील शेतकरी आहेत. तर दीप्ती शर्मा हिचे वडील कानपूरमध्ये व्यावसायिक आहेत. स्फोटक फलंदाज शेफाली वर्मा हिचे वडील ज्वेलर्स आहेत. सेमीफायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवून देणारी जेमिमा रॉड्रिग्स हिचे वडील क्रिकेट कोच आहेत. या सर्व खेळाडू सामान्य घरातून आलेल्या असल्या तरी आज त्यांची कामगिरी असामान्य आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आणि वडिलांच्या कठोर परिश्रमामुळेच आज त्या इथपर्यंत पोहोचू शकल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले जात आहे.
