GT vs MI : मुंबईसमोर गुजरातला विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखण्याचं आव्हान, पलटण जिंकणार?
Gujarat Titans vs Mumbai Indians Ipl 2025 Eliminator : आयपीएल 2025 फायनलसाठी 1 संघ निश्चित झाला आहे. त्यानंतर आता 3 संघात एका जागेसाठी चुरस आहे. गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील विजेता संघ पुढील फेरीत पोहचणार आहे.

आयपीएल 2025 मधील क्वालिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत फायलमध्ये रुबाबदार एन्ट्री केली. आरसीबीने विजयासाठी मिळालेलं 102 धावांचं आव्हान हे 10 ओव्हर ठेवून 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. आरसीबीने या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे आता आरसीबी आयपीएल चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर आहे. तर दुसऱ्या बाजूला पराभवानंतरही पंजाबला फायनलमध्ये पोहचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. पंजाब क्वालिफायर 2 मध्ये कुणाविरुद्ध भिडणार? हे 30 मे रोजी स्पष्ट होणार आहे.
गुजरात विरुद्ध मुंबई आमनेसामने
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स भिडणार आहेत. हा सामना शुक्रवारी 30 मे ला होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये पंजाब विरुद्ध भिडेल. तर पराभूत होणाऱ्या संघांचा आव्हान संपुष्ठात येईल. त्यामुळे गुजरात आणि मुंबई दोन्ही संघांसाठी ही आरपार अर्थात करो या मरो अशी लढाई असणार आहे.
मुंबई पराभवाची हॅटट्रिक टाळणार?
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरातच्या नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे. मुंबई विरुद्ध गुजरात दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत 2 वेळा आमनेसामने आले होते. तेव्हा गुजरातने मुंबईला दोन्ही सामन्यात पराभूत केलं होतं. त्यामुळे मुंबईकडे या 2 पराभवांची परतफेड करत गुजरातचा या मोसमातून पत्ता कट करण्याची सुवर्णसंधी आहे. आता पलटण या संधीचं सोनं करते की गुजरात मुंबई विरुद्ध विजयी हॅटट्रिक पूर्ण करते? याचं उत्तर हे सामन्याच्या निकालानंतरच मिळेल.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन्ही संघाचा एकूण 7 वेळा आमनासामना झाला आहे. आकडेवारीनुसार, गुजरात टायटन्स मुंबईवर वरचढ राहिली आहे. गुजरातने 7 पैकी सर्वाधिक 5 सामन्यांमध्ये मुंबईवर मात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईला केवळ 2 वेळाच गुजरात विरुद्ध पलटवार करता आला आहे. त्यामुळे मुंबईने शुक्रवारी गुजरातचा धुव्वा उडवत तिसरा विजय मिळवावा आणि गुजरातचा अचूक हिशोब करावा? अशी पलटणच्या चाहत्यांची इच्छा आहे. आता दोघांपैकी कोणता संघ जिंकतो आणि कुणाचा बाजार उठतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
