IPL 2025 Schedule : 10 संघ, 13 शहरं आणि 74 सामने, आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना केव्हा?
IPL 2025 Full Schedule Announcement : आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? क्रिकेट चाहत्यांच्या या प्रश्नाला अखेर पूर्णविराम लागला आहे. आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

साऱ्या क्रिकेट चाहत्यांना आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत. अशात भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. खेळाडूंची आणि क्रिकेट चाहत्यांची अखेर अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने या 18 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयपीएल या सोशल मीडिया हॅन्डलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
पहिला सामना कधी?
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. गतविजेत्या कोलकाता टीमच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात इडन गार्डनमध्ये हा सामना होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी 23 मार्चला या स्पर्धेतील पहिल्या डबल हेडरचं (एकाच दिवशी 2 सामने) आयोजन करण्यात आलं आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध राजस्थान आमनेसामने असतील. तर दुसरा सामना हा महामुकाबला असणार आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई अर्थात रोहित शर्मा विरुद्ध महेंद्रसिंह धोनी असा हा थेट सामना असणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. तसेच प्लेऑफ सामन्याचं आयोजन हे 20 ते 23 मे दरम्यान करण्यात आलं आहे. तर 25 मे रोजी कोलकातात अंतिम सामना पार पडेल.
65 दिवस आणि 74 सामने
यंदाच्या हंगामात एकूण 65 दिवसांत 74 सामने खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि चेन्नई हे या स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. हे आयपीएलमधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी या हंगामात एकूण 2 वेळा आमनेसामने असणार आहेत. तसेच बंगळुरु-चेन्नई यांच्यातही 2 सामने होणार आहेत. यंदा एकूण 13 ठिकाणी हे सामने पार पडणार आहेत. त्यानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगलुरु, हैदराबाद, लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, धर्मशाळा, न्यू चंडीगड, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथे सामने खेळवण्यात येणार आहेत.
IPL 2025 चं वेळापत्रक जाहीर
🚨 News 🚨
BCCI announces schedule for TATA IPL 2025
Details 🔽
— IndianPremierLeague (@IPL) February 16, 2025
एकूण 12 डबल हेडर
दरम्यान यंदाच्या हंगामात एकूण 12 डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. राजस्थान, दिल्ली, लखनऊ आणि गुजरात हे 4 संघ दुपारी प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. तर उर्वरित 6 संघ दुपारी प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहेत. राजस्थान यंदा जयपूर-गुवाहाटी, पंजाब न्यू चंडीगढ-धर्मशाळा आणि डीसी दिल्ली-विशाखापट्टणम येथे आपले सामने खेळणार आहे. धर्मशाळा येथे यंदा 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. मुंबई, दिल्ली, गुजरात, लखनऊ आणि हैदराबाद बी तर कोलकाता, बंगळुरु, राजस्थान, चेन्नई आणि पंजाब ए ग्रुपमध्ये आहेत.