MI vs SRH : मुंबई इंडियन्सचा सांघिक विजय, वानखेडेत हैदराबादवर 4 विकेट्सने मात
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match Result : मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवून पॉइंट्स टेबलमधील आपलं स्थान सुधारलं. मुंबईचा हा हैदराबादविरुद्धचा आयपीएल इतिहासातील 11 वा विजय ठरला.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादवर 5 विकेट्सने मात करत आयपीएलच्या 18 व्या मोसमातील एकूण तिसरा तर वानखेडे स्टेडियमधील दुसरा विजय मिळवला आहे. सनरायजर्स हैदराबादने मुंबईला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 18.1 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने 166 धावा केल्या. मुंबईचा हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्धचा आयपीएल इतिहासातील 24 व्या सामन्यातील 11 वा विजय ठरला. मुंबईची या विजयानंतर पॉइंट्स टेबलमधील स्थितीही सुधारली आहे. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादचा हा या मोसमातील पाचवा पराभव ठरला.
मुंबईची बॅटिंग
मुंबईच्या विजयात सर्व फलंदाजांनी योगदान दिलं. मुंबईसाठी विल जॅक्स याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. विलने 26 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. विलने या खेळीत 2 सिक्स आणि 3 फोर लगावले. ओपनर रायन रिकेल्टन याने 23 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा केल्या. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या मुंबईकर फलंदाजांनी प्रत्येकी 26-26 धावांचं योगदान दिलं. इमपॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या रोहितने 3 षटकार लगावले. तर सूर्यकुमारने या खेळीत 2 सिक्स आणि 2 फोर लगावले. कर्णधार हार्दिक पंड्या याने 9 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 21 रन्स केल्या. तर तिलक वर्मा मुंबईला जिंकून नाबाद परतला. तिलकने 17 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 21 धावा केल्या.
हैदराबादकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. मात्र त्यापैकी फक्त तिघांनाच विकेट घेण्यात यश आलं. कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. कमिन्सने तिघांना आऊट केलं. एशान मलिंगा याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हर्षल पटेल याने एक विकेट घेतली.
पलटणचा घरच्या मैदानात दुसरा विजय
महासंग्राम का पहला अध्याय हमारे नाम! 🔥#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvSRH pic.twitter.com/TrqDjw33YI
— Mumbai Indians (@mipaltan) April 17, 2025
पहिल्या डावात काय झालं?
दरम्यान त्याआधी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादला मोठी धावासंख्या करण्यापासून रोखलं. त्यामुळे हैदराबादला रडत-खडत 160 पार मजल मारता आली. हैदराबादने 5 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. हैदराबादसाठी अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 40 धावा केल्या. हेनरिक क्लासेन याने 37 धावांचं योगदान दिलं. ट्रेव्हिस हेड 28, नितीश रेड्डी 19 आणि अनिकेत वर्मा 18* धावा केल्या. तर पॅट कमिन्सने नाबाद 8 धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून विल जॅक्स याने हैदराबादच्या दोघांना आऊट केलं. तर ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
