IPL 2025 : पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स रद्द झालेल्या सामन्याचं पुढे काय? जाणून घ्या
आयपीएल 2025 स्पर्धेतील 8 मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता. पाकिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 10.1 षटकात 1 गडी गमवून 122 धावा केल्या होत्या. पण या सामन्याचं पुढे काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचं उत्तर बीसीसीआयने नव्या वेळापत्रकात दिलं आहे.

पाकिस्तानने भारतीय सैन्य दलापुढे नांगी टाकल्यानंतर सीजफायरची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर सीमेवरील तणाव निवळला असून सर्वकाही सुरळीत सुरु झालं आहे. या तणावादरम्यान आयपीएल 2025 स्पर्धा अर्धवट थांबवण्यात आली होती. आता ही स्पर्धा एका आठवड्याच्या स्थगितीनंतर 17 मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. पण 8 मे रोजी अर्धवट सोडलेल्या सामन्याचं काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता. हा सामना पुन्हा खेळला जाणार की रद्द मानला जाईल. नवं वेळापत्रक जाहीर करताना बीसीसीआयने स्पष्ट केलं की, हा सामना पुन्हा खेळला जाईल. 8 मे रोजी धर्मशाळेत खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने 10.1 षटकात 1 गडी गमवून 122 धावा केल्या होत्या. तेव्हा अचानक ब्लॅकआऊट झाला आणि सुरक्षेच्या कारणास्तव सामना रद्द केला. तसेच खेळाडू आणि प्रेक्षकांना सुरुक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे या सामन्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल अशी चर्चा होती. मात्र तसं काही झालं नाही. तसं झालं असतं तर प्लेऑफचं गणित आणखी बिघडलं असतं.
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना जयपूरमध्ये
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रद्द झालेला सामना 24 मे रोजी जयपूरमध्ये पुन्हा खेळला जाणार आहे. हा सामना जिथे थांबला तेथून सुरु होईल की नाही? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. हा सामना नव्याने खेळला जाईल. त्यामुळे गुणतालिकेत कोणताच बदल झालेला नाही. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्रत्येकी 16 गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स 15 गुणांसह तिसऱ्या, तर मुंबई इंडियन्स 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
आयपीएल 2025 स्पर्धा 17 मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. बाद फेरीसह आयपीएल स्पर्धेत 17 सामने होणार आहेत. बंगळुरु, दिल्ली, लखनौ, जयपूर, मुंबई आणि अहमदाबादला होणार आहे. 3 जूनला अंतिम फेरीचा सामना होणार आहे. तर नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. हा सामना बंगळुरुत होणार आहे.