IPL 2026: हार्दिक पांड्याचं कर्णधारपद जाणार? मुंबई इंडियन्सची आकडेवारी पाहून चर्चांना उधाण

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची नाजूक स्थिती आहे. प्लेऑफचा मार्ग प्रत्येक पराभवानंतर कठीण होत चालला आहे. असं असताना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

IPL 2026: हार्दिक पांड्याचं कर्णधारपद जाणार? मुंबई इंडियन्सची आकडेवारी पाहून चर्चांना उधाण
IPL 2026: हार्दिक पांड्याचं कर्णधारपद जाणार? मुंबई इंडियन्सची आकडेवारी पाहून चर्चांना उधाण
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 24, 2026 | 5:51 PM

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा दरारा आहे. कारण दिग्गज खेळाडूंसोबत नवख्या खेळाडूंची धास्ती सर्वच फ्रेंचायझींना असते. असं असताना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची स्थिती नाजूक आहे. हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सोपवलं गेलं. मात्र तेव्हापासून मुंबई इंडियन्स संघाला उतरती कला लागली आहे. हार्दिक पांड्याच्या अडीच वर्षांच्या कालावधीतच मुंबई इंडियन्स संघाची वाताहत झाली आहे. प्रत्येक सामन्यानंतर मुंबई इंडियन्स सुमार कामगिरीचं दर्शन घडवत आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत तर विजयासाठी मुंबई इंडियन्स संघ कासावीस झालेला दिसत आहे. त्यामुळे आयपीएल 2026 पर्वानंतर हार्दिक पांड्याच्या हातून नेतृत्व जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्णधार म्हणून त्याचं हे शेवटचं पर्व असण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची स्थिती पाहून आता हार्दिक पांड्याच्या हातून नेतृत्व जाणार अशी क्रीडावर्तुळात चर्चा रंगली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेची सुरूवात मुंबई इंडियन्सने विजयाने केली होती. त्यामुळे या पर्वात सर्वकाही ठीक होईल असं वाटलं होतं. मात्र त्यानंतर सलग चार पराभवांना सामोरं जावं लागलं. सहाव्या सामन्यात विजय पदरी पडला. पण सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दारूण पराभव केला. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी मुंबई इंडियन्स संघाने केली. कारण चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 103 धावांनी पराभूत केलं. पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने सलग तीन पराभव पाहिले. आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी दिलेल्या 207 धावांचा पाठलाग करताना फक्त 104 धावा करता आल्या. हा मुंबई इंडियन्सचा चेन्नईविरुद्ध सर्वात कमी स्कोअर होता.

हार्दिक पांड्याने 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद हाती घेतलं होतं. त्यानंतर आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 22 सामने गमावले. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स असून 21 सामन्यात पराभूत झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघ या दरम्यात कात टाकत होता. पण मुंबई इंडियन्सचं तसं काहीच नव्हतं. कारण या संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा होता. हार्दिक पांड्याला दिग्गज खेळाडूंना सोबत घेऊन संघ चालवणं जमत नसल्याचं बोललं जात आहे. इतकंच काय तर हार्दिक पांड्याची कामगिरीही निराशाजनक आहे. त्याने सहा डावात 97 धावा केल्या आणि फक्त 3 विकेट घेतल्या. त्याने 12.66 च्या इकोनॉमी रेटने धावा केल्या.

हार्दिक पांड्या नेतृत्व सांभाळण्यात अपयशी ठरत असल्याने तिलक वर्माचं नाव मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी पुढे येत आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून त्याच्या खांद्यावर जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आकाश चोप्राने भाकीत वर्तवत सांगितलं की, तिलक वर्मा भविष्यात कर्णधार असेल आणि त्यासाठी फार काही वेळ लागणार नाही. त्यामुळे पुढच्या पर्वात हा बदल दिसेल का? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी विचारत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us